Future & Options Trading : अनेकजण शेअर मार्केटकडे झटपट पैसे कमावण्याचे साधन म्हणून पाहतात. यातही फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये काही तासांत श्रीमंतीचे स्वप्न गुंतवणूकदारांना पडत आहेत. यामुळे अलीकडच्या काळात फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेडिंग करणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. तुम्हीही असा काही विचार करत असाल तर थांबा. बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) नुकताच या संदर्भात एक अहवाल प्रकाशित केला. यामधील निष्कर्ष तुमची झोप उडवू शकतात.
शेअर बाजारातील फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेडिंगकडे (F&O Trading) सामान्य गुंतवणूकदारांचा कल वाढत आहे. यामध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होत आहे. सेबीच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. अहवालानुसार, १० पैकी ९ जणांना फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे.
सेबीच्या अहवालातून धक्कादायक आकडेवारी
अहवालानुसार, फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये ९३ टक्के गुंतवणूकदारांनी आर्थिक वर्ष २०२२ ते आर्थिक वर्ष २०२४ या ३ वर्षांत १.८ लाख कोटी रुपये गमावले आहेत. जानेवारी २०२३ मध्ये, बाजार नियामकाने असाच एक अहवाल प्रसिद्ध केला होता. ज्यामध्ये ८९ टक्के इंडिव्हिज्युअल इक्विटी F&O ट्रेडर्सने आर्थिक वर्ष २०२२ मध्ये पैसे गमावले आहेत.
सरासरी २ लाख रुपयांचे नुकसान
अभ्यासानुसार, १ कोटींहून अधिक इंडिव्हिज्युअल F&O ट्रेडर्सपैकी ९३ टक्के गुंतवणूकदारांना गेल्या ३ आर्थिक वर्षांत तोटा सहन करावा लागला आहे. त्यांचे सरासरी नुकसान सुमारे २ लाख रुपये होते, ज्यात व्यवहार खर्चाचाही समावेश आहे.
प्रोप्रायटरी ट्रेडर्स आणि एफपीआयला होतो फायदा
२०२३-२४ (FY24) या आर्थिक वर्षात इंडिव्हिज्युअल ट्रेडर्सचा ६१ हजार कोटी रुपयांहून अधिक तोटा सहन करावा लागला. या कालावधीत प्रोप्रायटरी ट्रेडर्सने ३३ हजार कोटी रुपयांचा एकूण नफा कमावला. तर विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPI) २८ हजार कोटी रुपयांचा एकूण नफा कमावला. परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांच्या नफ्यांपैकी ९७% आणि प्रोप्रायटरी ट्रेडर्सच्या नफ्यांपैकी ९६% अल्गोरिदमिक ट्रेडिंगमधून आले आहेत.
म्युच्युअल फंडपेक्षा F&O ट्रेडिंगला पसंती
अहवालानुसार, फ्युचर्स आणि ऑप्शन्स ट्रेडिंग करणाऱ्या ३० वर्षाखालील तरुणांची संख्या आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ३१ टक्क्यांवरून २०२४ मध्ये ४३ टक्क्यांवर गेली आहे. फ्युचर्स आणि ऑप्शन्स ट्रेडिंग करणारे ७२% पेक्षा जास्त ट्रेडर्स हे टॉप ३० शहरांबाहेरचे होते तर या शहरांमधील म्युच्युअल फंडाचा वाटा ६२% आहे.