Join us

सेन्सेक्स 453, तर निफ्टी 123 अंकांनी घसरले; गुंतवणूकदारांनी ₹1.68 लाख कोटी गमावले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 4:55 PM

Share Market Today: गुरुवारच्या तेजीनंतर शुक्रवारी शेअर बाजार कोसळला.

Share Market Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी(15 मार्च) शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 453 अंकांनी, तर निफ्टी 123 अंकानी घसरला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एका दिवसात सुमारे 1.67 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. टेलिकॉम आणि एफएमसीजी वगळता सर्व BSE निर्देशांक लाल रंगात बंद झाले. 

आज व्यवहाराच्या शेवटी BSE सेन्सेक्स 453.85 अंकांनी किंवा 0.62% घसरुन 72,643.43 वर आला, तर NSE निफ्टी 150.10 अंकांनी किंवा 0.68% ने घसरुन 22,023.35 च्या पातळीवर बंद झाले. आज BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 378.35 लाख कोटी रुपयांवर आले. 14 मार्च रोजी हे 379.98 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1.63 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.63 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.

सेन्सेक्सचे 5 सर्वाधिक वाढणारे शेअर्स बीएसई सेन्सेक्सच्या 30 पैकी फक्त 6 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्येही भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 1.55% वाढ झाली. यानंतर, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि इंडसइंड बँकेचे शेअर्स सर्वाधिक वाढले. नुकसान झालेल्या 24 शेअर्समध्ये महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स 5.01 टक्क्यांसह सर्वाधिक घसरले. तर टाटा मोटर्स, एनटीपीसी, एचसीएल टेक आणि लार्सन अँड टुब्रोचे शेअर्स 1.67% ते 2.43% घसरुन लाल रंगात बंद झाले. 

2,015 शेअर्समध्ये घसरण झालीआज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर घसरणीसह बंद होणाऱ्या शेअर्सची संख्या वाढीव शेअर्सपेक्षा जास्त होती. एक्सचेंजमध्ये आज एकूण 3,936 शेअर्सचे व्यवहार झाले. यापैकी 1,806 शेअर्स वाढीसह बंद झाले, तर 2015 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तसेच, 115 शेअर्स स्थिर होते. आजच्या व्यवहारादरम्यान 74 शेअर्सनी 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, तर 58 शेअर्सनी 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला. 

(टीप-शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे. पैसे गुंतवण्यापूर्वी तज्ञाचा सल्ला घ्या.) 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक