गुरुवारी म्हणजेच 6 जुलै रोजी शेअर बाजारानं विक्रमी पातळी गाठली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही विक्रमी उच्चांकावर बंद झाले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांनीही दिवसाच्या व्यवहारात त्यांचा आजवरचा उच्चांकी स्तर गाठला. त्यामुळे शेअर बाजारातीलगुंतवणूकदारांना सुमारे 1.71 लाख कोटी रुपयांचा नफा झाला आहे.
कामकाजाच्या अखेरच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा (BSE) 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 339.60 अंकांनी किंवा 0.52 टक्क्यांनी वाढून 65,785.64 वर बंद झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (NSE) 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 98.80 अंकांच्या किंवा 0.51 टक्क्यांच्या वाढीसह 19,497.30 च्या विक्रमी पातळीवर बंद झाला.
गुंतवणूकदारांनी कमावले 1.71 लाख कोटी
बीएसईवरील लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 6 जुलै रोजी 301.61 लाख कोटी रुपयांवर पोहोचले, हे बुधवार, 6 जुलै रोजी 299.90 लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे, BSE मध्ये लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप सुमारे 1.71 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.71 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
या शेअर्समध्ये तेजी
सेन्सेक्सचे 30 पैकी 19 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यातह महिंद्रा अँड महिंद्राच्या (M&M) शेअर्सनं सर्वाधिक 5.03 टक्क्यांची वाढ नोंदवली. यानंतर, पॉवर ग्रिड, टाटा मोटर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एटीपीसीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आणि ते 1.56 टक्के ते 3.57 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.
या शेअर्समध्ये घसरण
दुसरीकडे, सेन्सेक्समधील उर्वरित 11 शेअर्समध्ये आज घसरण दिसून आले. यामध्येही मारुती सुझुकीच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 1.30 टक्के घसरण झाली. याशिवाय, एचसीएल टेक, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक आणि इन्फोसिसचे शेअर्स देखील आज घसरणीसह बंद झाले आणि सुमारे त्यात 0.25 टक्के ते 1.12 टक्क्यांपर्यंत घसरण झाली.