Lokmat Money >शेअर बाजार > शेअर मार्केटमध्ये पैसा लावताय? ही बातमी उघडेल डोळे; गुंतवणूकदारांनी गमावले ७ हजार कोटी

शेअर मार्केटमध्ये पैसा लावताय? ही बातमी उघडेल डोळे; गुंतवणूकदारांनी गमावले ७ हजार कोटी

Share Market Fraud : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या हजारो लोकांना शिकार बनवून एका भामट्याने सुमारे ७ हजार कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 04:16 PM2024-10-08T16:16:14+5:302024-10-08T16:17:20+5:30

Share Market Fraud : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या हजारो लोकांना शिकार बनवून एका भामट्याने सुमारे ७ हजार कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.

share market share market fraud worth rs 7000 crore from investors accused fled from india | शेअर मार्केटमध्ये पैसा लावताय? ही बातमी उघडेल डोळे; गुंतवणूकदारांनी गमावले ७ हजार कोटी

शेअर मार्केटमध्ये पैसा लावताय? ही बातमी उघडेल डोळे; गुंतवणूकदारांनी गमावले ७ हजार कोटी

Share Market Fraud : तुम्हीही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमचं आर्थिक नुकसान होण्यापासून थांबवू शकते. बाजारात केवळ घसरणीमुळेच नुकसान होते असे समजू नका. गुंतवणुकीच्या नावाखाली अनेकजणांना आर्थिक गंडा घातला जात आहे. हैदराबादमध्ये घडलेल्या एका घटनेनंतर गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रचंड नफा कमावण्याच्या नादात तुम्ही देखील तुमच्या कष्टाचे पैसे गमावून बसाल. अशाच एका फसवणुकीला बळी पडून हजारो गुंतवणूकदारांनी मेहनतीचे ७ हजार कोटी रुपये गमावले आहेत.

आसामस्थित डीबी स्टॉक ब्रोकिंग (DB Stock Broking) कंपनीने शेअर बाजारात पैसे गुंतवण्याच्या नावाखाली देशभरातील अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. लोभापोटी काही गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. हैदराबादमध्ये ब्रोकिंग कंपनीचे मालक दीपंकर बर्मन यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबराबाद पोलिसांनी या ऑनलाइन स्टॉक ब्रोकिंग कंपनीविरुद्ध फसवणूक आणि गुंतवणूकदारांच्या विश्वासाला तडा देण्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

अनेक शहरात उघडले होते ऑफिस
डीबी स्टॉक ब्रोकिंग कंपनीने देशभर आपले हातपाय पसरले आहेत. अनेक प्रमुख शहरांमध्ये त्यांनी कार्यालये उघडली आहेत. गुवाहाटी व्यतिरिक्त या कंपनीने हैदराबाद, बंगळुरू आणि मुंबई येथेही आपल्या शाखा उघडल्या आहेत. या शहरातील लाखो गुंतवणूकदारांकडून पैसे जमा केले. या प्रकरणी तेलंगणा प्रोटेक्शन ऑफ डिपॉझिटर्स ऑफ फायनान्शिअल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट अंतर्गत पोलिसांनी ५ गुन्हे दाखल केले आहेत.

जुलैपासून पेमेंट मिळालेले नाही
गेल्या महिन्यात २३ सप्टेंबर रोजी सॉफ्टवेअर अभियंता शमई पंचक्‍शर यांनी हैदराबादमध्ये तक्रार दाखल केली होती. पंचक्‍शर यांना कंपनीने चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले होते. पंचक्‍शर यांनी कंपनीद्वारे ११ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र, त्यांना अद्याप एक रुपयादेखील परत मिळालेला नाही. नफा तर दूरच राहिला. कंपनीने व्याजाची रक्कमही भरलेली नाही. आणखी एक गुंतवणूकदार गंताडी हरीश यांनी डिसेंबर २०२२ मध्ये ८८.५ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. विश्वजीत सिंग यांनी ३६.८० लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र, बदल्यात त्यांना केवळ १६.२० लाख रुपये व्याज परत केले.

ऑस्ट्रेलियातही पसरलंय जाळं
तेलंगणा पोलिसांचे म्हणणे आहे की या प्रकरणाच्या तपासानंतर आतापर्यंत २३ हजार गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. आसाम पोलिसांनी आरोपी दीपंकरविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी भारताबाहेर पळून गेला असून तो ऑस्ट्रेलियात लपल्याची माहिती आहे. आरोपीने ऑस्ट्रेलियातील अनेक गुंतवणूकदारांचीही फसवणूक केली असल्याची माहिती समोर आली आहे.
 

Web Title: share market share market fraud worth rs 7000 crore from investors accused fled from india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.