zero brokerage trading : तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. यापुढे तुम्हाला झिरो ब्रोकरेजचा लाभ घेता येणार नाही. 'शुन्या' आणि 'कोटक निओ' सारख्या मोठ्या आणि प्रसिद्ध ब्रोकरेज प्लॅटफॉर्मने आता हात झटकले आहेत. या दोन्ही फर्मने फी रचनेत बदल करणार असल्याचे जाहीर केले आहे. हे दोन्ही प्लॅटफॉर्म झिरो ब्रोकरेज ट्रेडिंगसाठी प्रसिद्ध आहेत. एकूणच, जर तुम्ही या प्लॅटफॉर्मवर स्टॉक मार्केट ट्रेडिंग करत असाल तर आता तुम्हाला जास्त किंमत मोजावी लागेल.
मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, कमिशन-फ्री ब्रोकरेज प्लॅटफॉर्म ‘शून्या’ ने २ डिसेंबर २०२४ पासून झिरो-ब्रोकरेज मॉडेल समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच, आपल्या शुल्काबाबत स्पष्टीकरण देताना कंपनीने म्हटले आहे की, वार्षिक देखभाल शुल्क (AMC) म्हणून प्रत्येक सक्रिय ट्रेडर्सकडून ४९९ रुपये प्रति वर्ष + GST आकारला जाईल. इंट्राडे, फ्युचर अँड ऑप्शन आणि कमोडिटी ट्रेडवर प्रति ऑर्डर ५ रुपये + GST आकारला जाईल. API ट्रेडिंगसाठी १,९९९ रुपये प्रति महिना शुल्क + GST लागू होईल. अल्गो ट्रेडिंग API द्वारे करता येते. गुंतवणूकदारांसाठी एक दिलासादायक बातमी आहे की शुन्याने डिलिव्हरी ट्रेड्स, ईटीएफ, बाँड्स, आयपीओ आणि म्युच्युअल फंडांवर झिरो ब्रोकरेज राखण्याचे आश्वासन दिले आहे.
कोटक निओची नवीन स्ट्रक्चर
शुन्याच्या या निर्णयापूर्वी, ४ नोव्हेंबर २०२४ रोजी, ‘कोटक निओ’ने इंट्राडे ट्रेड्सवर प्रति ऑर्डर १० रुपये ब्रोकरेज लागू केले आहे. याशिवाय कोटक यांनी इतर शुल्कातही बदल केले होते. याने F&O ट्रेडसाठी ०.२० टक्के आणि १० रुपये प्रति ऑर्डर स्टॉक डिलिव्हरी शुल्क लागू केले होते. कोटक सिक्युरिटीजचे डिजिटल बिझनेस हेड आशिष नंदा म्हणाले की, वाढत्या खर्चामुळे आणि बाजारातील बदलत्या परिस्थितीमुळे हे पाऊल उचलणे गरजेचे झाले आहे.
नियामक बदलांमुळे ब्रोकिंग कंपन्यांकडे पर्याय नाही
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) द्वारे नुकतेच एक्सचेंज रिबेट रद्द केल्यामुळे आणि साप्ताहिक पर्याय करार सुरू केल्यामुळे ब्रोकरेज कंपन्यांवरील आर्थिक दबाव वाढला आहे. यामुळे अनेक प्लॅटफॉर्मवर फ्लॅट-फी मॉडेल स्वीकारण्यास भाग पडत आहे. आशिष नंदा म्हणाले, “झिरो-ब्रोकरेज मॉडेल दीर्घकाळ टिकणारे नाही. २० रुपये देखील अनेक कंपन्यांसाठी अडचणीचे ठरू शकतात.