Join us

Share Market: छोट्या शेअर्समुळे झाली मोठी कमाई, गुंतवणूकदारांची संपत्ती ₹३ लाख कोटींनी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 4:17 PM

Share Market Today: जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी १९ ऑगस्ट रोजी जवळपास सपाट बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये मात्र जोरदार खरेदी झाली.

Share Market Today: जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी १९ ऑगस्ट रोजी जवळपास सपाट बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये मात्र जोरदार खरेदी झाली. यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची आज सुमारे ३ लाख कोटी रुपयांची कमाई झाली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक ०.५३ टक्क्यांनी वधारला तर स्मॉलकॅप निर्देशांक १.३३ टक्क्यांनी वधारला.

सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचं झालं तर बीएसई मेटल इंडेक्स २ टक्क्यांहून अधिक वधारला. तर ऑईल अँड गॅस, एनर्जी आणि युटिलिटी निर्देशांकात १ टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली. दुसरीकडे ऑटो आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली.

व्यवहाराअंती बीएसई सेन्सेक्स १२.१६ अंकांनी म्हणजेच ०.०१ टक्क्यांनी घसरून ८०,४२४.६८ च्या पातळीवर बंद झाला. तर एनएसईचा ५० शेअर्सचा प्रमुख इंडेक्स निफ्टी ३१.५० अंकांनी म्हणजेच ०.१३ टक्क्यांच्या वाढीसह २४,५७२.६५ च्या पातळीवर बंद झाला.

गुंतवणूकदारांनी कमावले २.९८ लाख कोटी

बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं एकूण मार्केट कॅप शुक्रवारी ४५१.५९ लाख कोटी रुपयांवरून १९ ऑगस्टपर्यंत ४५४.५७ लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. अशाप्रकारे बीएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप आज सुमारे २.९८ लाख कोटी रुपयांनी वाढलंय. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे २.९८ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सेन्सेक्सचे सर्वाधिक वाढलेले ५ शेअर्स

बीएसई सेन्सेक्सचे ३० पैकी १६ शेअर्स आज वधारले. यामध्ये टाटा स्टीलच्या शेअरमध्ये सर्वाधिक ३.०४ टक्क्यांची वाढ झाली. त्यानंतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), एनटीपीसी, जेएसडब्ल्यू स्टील आणि एशियन पेंट्सचे शेअर्स ०.८९ ते १.६२ टक्क्यांनी वधारले.

सेन्सेक्सचे ५ सर्वाधिक घसरलेले शेअर्स

तर सेन्सेक्सचे उर्वरित १५ शेअर्स आज घसरले. यामध्ये महिंद्रा अँड महिंद्राचा शेअर २.५५ टक्क्यांनी सर्वाधिक घसरला. इंडसइंड बँक, भारती एअरटेल, अॅक्सिस बँक आणि टाटा मोटर्सचे समभाग ०.८९ ते १.१३ टक्क्यांनी घसरले.

टॅग्स :शेअर बाजार