Join us  

Share Market IPO : सोलार कंपनीनं केलं मालामाल, ₹११५ रुपयांचा शेअर पहिल्याच दिवशी ₹३०० पार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 12:31 PM

कंपनीचे शेअर्स पहिल्याच दिवशी १८६ टक्क्यांच्या नफ्यासह शेअर बाजारात लिस्ट झाले.

Alpex Solar IPO: सोलर कंपनी अल्पेक्स सोलारनं (Alpex Solar) पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तुफान एन्ट्री घेतली. अल्पेक्स सोलारचे शेअर्स 186 टक्क्यांच्या नफ्यासह 329 रुपयांवर बाजारात लिस्ट झाले आहेत. पहिल्याच दिवशी कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. आयपीओमध्ये गुंतवणूकदारांना अल्पेक्स सोलारचे शेअर्स 115 रुपयांना अलॉट झाले होते. अल्पेक्स सोलारचा IPO 8 फेब्रुवारी 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला होता आणि तो 12 फेब्रुवारीपर्यंत खुला होता. 

लिस्टिंगनंतर शेअर्समध्ये तेजी 

मजबूत लिस्टिंगनंतर अल्पेक्स सोलरचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 345.45 रुपयांवर पोहोचले आहेत. अल्पेक्स सोलरचे शेअर्स 115 रुपयांच्या इश्यू प्राईजच्या तुलनेत 200 टक्क्यांनी वाढले आहेत. अल्पेक्स सोलरचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या SME प्लॅटफॉर्मवर लिस्ट झाले आहेत. अल्पेक्स सोलरची सुरुवात ऑगस्ट 1993 मध्ये झाली. कंपनी सौर पॅनेल तयार करण्याचं काम करते. अल्पेक्स सोलर मोनोक्रिस्टलाइन आणि पॉलीक्रिस्टलाइन सेल तंत्रज्ञानाचा वापर करते.  

324 पट सबस्क्राईब झालेला आयपीओ 

अल्पेक्स सोलरचा आयपीओ एकूण 324.03 पट सबस्क्राईब झाला होता. कंपनीच्या आयपीओ मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांच्या श्रेणीत आयपीओ 351.89 पट सबस्क्राईब झाला होता. त्याच वेळी, नॉन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सच्या (NII) श्रेणीमध्ये 502.31 पट तर, क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा कोटा (QIB) 141.48 पट सबस्क्राइब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदार कंपनीच्या आयपीओमध्ये 1 लॉटसाठी बोली लावू शकणार होते. आयपीओच्या एका लॉटमध्ये 1200 शेअर्स होते. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना किमान 1,38,000 रुपये गुंतवावे लागणार होते. अल्पेक्स सोलरच्या सार्वजनिक इश्यूचा एकूण आकार 74.52 कोटी रुपयांपर्यंत होता. आयपीओपूर्वी, अॅपेक्स सोलारमध्ये प्रवर्तकांचा हिस्सा 93.53 टक्के होता, जो आता 68.76 टक्क्यांवर आला आहे 

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार