Join us  

Share Market :सेन्सेक्स निफ्टीची मजबूत सुरूवात, अदानी समूहाचे सर्व १० शेअर्स ग्रीन झोनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 10:03 AM

नवीन कॅलेंडर वर्षाच्या तिसऱ्या आठवड्याच्या अखेरच्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून आली.

Stock Market Open: नवीन कॅलेंडर वर्षाच्या तिसऱ्या आठवड्याच्या अखेरच्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून आली. सकाळच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स 534 अंकांच्या वाढीसह 71740 अंकांच्या पातळीवर काम करत होता तर निफ्टी 168 अंकांच्या वाढीसह 21630 अंकांच्या पातळीवर उघडला होता. गेल्या तीन दिवसांपासून शेअर बाजारात मोठी घसरण सुरू होती, मात्र शुक्रवारी गिफ्ट निफ्टीनं शेअर बाजाराचं कामकाज सकारात्मक पद्धतीनं सुरू होण्याचे संकेत दिले होते.

शुक्रवारी, निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकात वाढ दिसून आली. शेअर बाजारात कामाकाजाच्या सुरुवातीला सन फार्मा, सिप्ला, टेक महिंद्रा आणि टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली होती. तर एलटीआय माइंडट्री, एचडीएफसी बँक, एनटीपीसी आणि टायटनचे शेअर्स तेजीसह ट्रेड करत होते.

शुक्रवारच्या व्यवहारात गिफ्ट निफ्टी मजबूतीनं उघडला. एचडीएफसी बँकेचे निकाल आणि जागतिक संकटामुळे गुरुवारीही शेअर बाजारात घसरण नोंदवण्यात आली. रिलायन्स, एचयूएल आणि अल्ट्राटेक सारख्या निफ्टीमध्ये हेवीवेट प्रभाव असलेले शेअर्स त्यांचे निकाल जाहीर करणार आहेत, त्यानंतर शेअर बाजाराच्या वाटचालीबद्दल कल्पना येऊ शकते.

अदानीच्या शेअर्समध्ये वाढ

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणार्‍या कंपन्यांबद्दल बोलायचं झाल्यास, शुक्रवारी सकाळच्या सत्रात गौतम अदानी समूहाच्या सर्व 10 लिस्टेड कंपन्यांच्या समभागांमध्ये वाढ झाली. अदानी टोटल गॅस 1.40 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता तर अदानी एनर्जी सोल्यूशनचे शेअर्स किंचित वाढीसह ट्रेड करत होते.

टॅग्स :शेअर बाजारअदानी