Voltas Shares : शेअर मार्केटच्या वादळात दिग्गज कंपन्यांचे शेअर्सही भुईसपाट झाले आहेत. यामध्ये रिलायन्स, इन्फोसिसपासून टाटा समूहातील कंपन्यांचाही समावेश आहे. विशेषत: टाटा मोटर्सचे शेअर्स गेल्या ७ महिन्यांत ४५ टक्क्यांनी घसरले आहेत. गेल्या ५ ट्रेडिंग सत्रांपासून शेअर बाजारात विक्रीचे वर्चस्व आहे. या वाईट काळातही टाटा समूहातील एक कंपनी भिंत म्हणून उभी राहिली आहे. एकीकडे समूहातील मोठ्या कंपन्यांचे शेअर घसरत आहेत, तर व्होल्टासचे शेअर्स वाढत आहेत. १७ फेब्रुवारीपासून व्होल्टासच्या शेअर्समध्ये तेजीचा टप्पा सुरू झाला आहे. अवघ्या १५ दिवसांत शेअर १२०० रुपयांवरून १४०० रुपयांपर्यंत वाढला आहे.
१५ दिवसांत १० टक्के वाढ
शेअर बाजारातील प्रचंड घसरणीदरम्यान टाटा समूहाच्या एसी उत्पादन कंपनी व्होल्टासच्या शेअर्समध्ये १५ दिवसांत १० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. विशेष म्हणजे आजही व्होल्टासचे शेअर्स ३ टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहेत. व्होल्टास शेअर्सची वाढ पाहून गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या आहेत.१८ फेब्रुवारीला ८० लाख शेअर्सची खरेदी-विक्री झाली. गेल्या १५ दिवसातील सरासरी व्यापार १० लाखांच्या आसपास आहे. टेक्निकल चार्ट आणि उत्कृष्ट किमतीच्या आधारे, अनेक बाजार तज्ञांनी व्होल्टास शेअर्सवर खरेदीचा सल्ला दिला आहे.
टाटा समूहातील बहुतेक कंपन्यांचे शेअर्स धडाम
वास्तविक, व्होल्टास शेअर्सने गेल्या ६ महिन्यांत २० टक्क्यांहून अधिक नकारात्मक परतावा दिला आहे. परंतु, गेल्या एका वर्षात या समभागाने २५ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. जर ५ वर्षांचा हिशोब केला तर व्होल्टास शेअर्सने या कालावधीत १०८ टक्के परतावा दिला आहे. दुसरीकडे, टाटा समूहातील कंपन्यांच्या समभागांमध्ये टाटा मोटर्स, ट्रेंट आणि टाटा स्टीलला सर्वाधिक फटका बसला आहे. हे स्टॉक्स त्यांच्या विक्रमी उच्चांकावरून लक्षणीय घसरले आहेत. टाटा मोटर्स ४० टक्के घसरला आहे. इतकेच नाही तर टीसीएसमध्येही मोठी घसरण झाली आहे. देशातील सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या यादीत टीसीएस एक क्रमांक घसरला आहे.