Share Market : सोमवारी शेअर बाजार ज्या पद्धतीने कोसळला ते पाहून मंगळवार आणखी वाईट ठरणार, अशी मनाची तयारी गुंतवणूकदारांनी केली होती. पण अमेरिकन शेअर बाजाराने दिलेल्या चांगल्या संकेतांमुळे संपूर्ण जगाचा मूड बदलला. मंगळवारी सकाळच्या सत्रात भारतीय शेअर बाजारात जोरदार खरेदी दिसून आली. सेन्सेक्स १०८९ अकांनी वाढून ७४,२२७.०८ वर बंद झाला. तर, निफ्टी ५० मध्ये ३७४ अकांची रिकव्हरी झाली. एका रात्रीत असं काय घडलं? की शेअर बाजाराने इतका मोठा यू-टर्न मारला. शेअर बाजारातील प्रचंड तेजीमागील कारण जाणून घेऊया.
जागतिक बाजारात चांगले संकेतसोमवारी झालेल्या मोठ्या घसरणीनंतर जागतिक बाजारात मोठी सुधारणा झाली आहे. आशियाई बाजारांमध्येही तेजी दिसून आली. जपानचा निक्केई ५.६%, हाँगकाँगचा हँग सेंग १.७% आणि चीनचा ब्लू-चिप निर्देशांक ०.६% वाढला. याचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर झाला आहे. भारतीय शेअर बाजारातील तेजीचे कारण म्हणजे जागतिक बाजारपेठेसह अमेरिकेकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा. अमेरिका आपला कठोर टॅरिफ धोरण शिथिल करेल, अशी आशा गुंतवणूकदारांना आहे. कारण, निर्णय मागे घेण्यासाठी ट्रम्प यांच्यावर दबाव वाढत आहे.
व्याजदर कमी होण्याची अपेक्षा :९ एप्रिल रोजी रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण बैठकीपूर्वी बाजारात उत्साह आहे. रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे वाढीला पाठिंबा देण्यासाठी धोरणात्मक भूमिका शिथिल होईल. अनेक तज्ञ ५० बेसिस पॉइंट्सच्या कपातीबद्दल बोलत आहेत. जर असे झाले तर गृहकर्ज आणि कार कर्जासह सर्व कर्जांचा ईएमआय कमी होईल. यामुळे बाजारात मागणी वाढेल.
घसरणीनंतर खरेदी : शेअर बाजारातील गुंतवणूकदार अलिकडच्या घसरणीचा फायदा घेत आहेत. निफ्टी त्याच्या सर्वोच्च पातळीपासून १४.८% खाली आला आहे, तर मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप निर्देशांक अनुक्रमे १९% आणि २२% घसरले आहेत. याचा फायदा घेत गुंतवणूकदार चांगल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवत आहेत. यामुळे बाजाराला आधार मिळाला आहे.
कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या : कच्च्या तेलाच्या किमती ६५ डॉलरच्या खाली आल्या आहेत. ऑगस्ट २०२१ नंतरची ही सर्वात कमी पातळी आहे. ब्रेंट क्रूड आणि WTI मध्ये मोठी घसरण झाली आहे, ज्यामुळे महागाईवरील दबाव कमी होण्याची शक्यता आहे. भारत आपल्या गरजेच्या ८५ टक्के तेल आयात करतो. स्वस्त कच्च्या तेलाचा भारताला मोठा फायदा होईल. त्याचा परिणाम आज बाजारातही दिसून येत आहे. बाजारात प्रचंड तेजी आहे.
यूएस बाँडचे उत्पन्न घसरले : अमेरिकेतील १० वर्षांच्या बाँडचे उत्पन्न ४.१४% पर्यंत घसरले आणि डॉलर निर्देशांक १०२.९२ वर व्यवहार करत होता. यामुळे परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय शेअर्समध्ये रस वाढला आहे, ज्यामुळे बाजारात आणखी गुंतवणूक होऊ शकते. परदेशी गुंतवणूकदारांच्या परतीमुळे बाजारात पुन्हा तेजी आली आहे.
गुंतवणूकदारांना ७.७ लाख कोटी रुपयांचा फायदा : सकाळच्या सत्राच्या २० मिनिटांत शेअर बाजारात प्रचंड तेजी आली. या २० मिनिटांत गुंतवणूकदारांनी मोठी वसुली केली. बीएसईच्या मार्केट कॅपमध्ये वाढ झाली. जर आपण आकडेवारी पाहिली तर, सकाळी ९:३५ वाजता शेअर बाजार त्याच्या शिखरावर होता तेव्हा बीएसईचे मार्केट कॅप ३,९६,९५,५८०.३७ कोटी रुपयांवर पोहोचले. तर एक दिवस आधी, बीएसईचे मार्केट कॅप ३,८९,२५,६६०.७५ कोटी रुपये होते. या काळात गुंतवणूकदारांना ७.७० लाख कोटी रुपये मिळाले आहेत.