Join us

कंपनी आपल्या शेअर्सचे तुकडे का करते? यात फायदा कुणाचा? कंपनी की गुंतवणूकदार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 15:24 IST

stock split : शेअर मार्केटमध्ये एखाद्या कंपनीने तिच्या शेअर्सचे विभाजन केलेले तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. मात्र, असे का करतात हे माहिती आहे का?

stock split : अनेक कंपन्या आपल्या शेअर्सचे विभाजन करतात हे तुम्ही ऐकलं असेल. मात्र, असे करण्यामागे कंपनीचा काय फायदा असतो? ही संपूर्ण प्रक्रिया कशी असते? हे तुम्हाला माहिती आहे का? जेव्हा एखाद्या कंपनीच्या शेअरची किंमत खूप जास्त होते, तेव्हा नवीन गुंतवणूकदारांच्या ती आवाक्याबाहेर जाते. अशा परिस्थितीत, कंपनी स्टॉक स्प्लिटचा पर्याय वापरते. ज्यामुळे शेअर्सची संख्या वाढते आणि प्रति शेअर किंमत मात्र कमी होते. पण, कंपनीच्या एकूण बाजार मूल्यात कोणताही बदल होत नाही. ही प्रक्रिया गुंतवणूकदारांसाठी शेअर्स अधिक सुलभ बनवते आणि ट्रेडिंग व्हॉल्यूम वाढवण्यास मदत करते.

सहसा चांगली कामगिरी करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सची किंमत खूप जास्त झाल्यास कंपनी स्टॉक स्प्लिट करण्याचा निर्णय घेते. यामुळे जास्तीत जास्त गुंतवणूकदार समभाग शेअर खरेदी करतात. शिवाय पण बाजारात तरलताही सुधारते.

स्टॉक स्प्लिट का केले जाते?

  • शेअरची किंमत कमी करणे : जेव्हा एखाद्या कंपनीच्या शेअरची किंमत खूप जास्त होते. तेव्हा नवीन गुंतवणूकदारांना असे समभाग खरेदी करता येत नाही. स्टॉक स्प्लिटमुळे शेअरची किंमत कमी होते, जेणेकरून अधिक लोक ते खरेदी करू शकतील.
  • तरलता वाढवणे : जेव्हा शेअर्सची संख्या वाढते तेव्हा ट्रेडिंग व्हॉल्यूम देखील वाढते, ज्यामुळे शेअर्सची खरेदी आणि विक्री करणे सोपे होते.
  • गुंतवणूकदारांना आकर्षिक करणे : कमी किमतीत उपलब्ध असलेले शेअर्स अधिक गुंतवणूकदारांना आकर्षित करतात. त्यामुळे गुंतवणूकदारांचा कंपनीत रस वाढतो.
  • बाजारातील सकारात्मक संदेश : जेव्हा कंपनी चांगली कामगिरी करत असते, तेव्हा स्टॉक स्प्लिट केले जातात, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आत्मविश्वास वाढतो.

स्टॉक स्प्लिट कसे काम करते?स्टॉक स्प्लिटचे गुणोत्तर ठरविले जाते, जसे की १ साठी २, १ साठी ३ किंवा १ साठी ५ इत्यादी. याचा अर्थ असा की प्रत्येक विद्यमान भागधारकाला त्याच्या जुन्या शेअर्सच्या बदल्यात अधिक नवीन शेअर्स मिळतात. समजा एखाद्या कंपनीच्या एका शेअरची किंमत १,००० रुपये आहे. तुम्ही १० शेअर्स खरेदी केले आहेत. म्हणजेच तुमचे एकूण होल्डिंग १०,००० रुपये आहे.आता जर कंपनीने १ साठी २ स्टॉक स्प्लिट केले तर तुमच्या १० शेअर्सचे २० शेअर्सपर्यंत वाढतील. पण, त्याचवेळी तुमच्या १००० रुपयाच्या शेअरची किंमत मात्र ५०० रुपये होईल. 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक