प्रसाद गो जोशीदेशातील औद्योगिक तसेच सेवा क्षेत्रातील उत्पादनात झालेली चांगली वाढ, जीएसटीचे वाढलेले संकलन, कंपन्यांचे चांगले आलेले निकाल, सकारात्मक जागतिक वातावरण आणि परकीय वित्तसंस्थांनी दिलेला हात या कारणांमुळे सलग तिसऱ्या सप्ताहात बाजाराने वाढ नोंदविली. तरी, अखेरच्या सत्रात विक्रीच्या माऱ्यामुळे बाजार काहीसा खाली आला.
बाजारात गतसप्ताहाचा आरंभ तेजीने झाला. त्यानंतर सेन्सेक्स ६१ हजार अंशांपर्यंत वाढला. या आठवड्यात सेन्सेक्स ९९०.५१ म्हणजेच १.६५ टक्क्यांनी वाढला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १.९६ म्हणजेच ३३०.३५ अंशांनी वाढून बंद झाला. गतसप्ताहामध्ये मिडकॅप आणि स्मॉल कॅप या दोन्ही निर्देशांकामध्ये वाढ झालेली दिसून आली.
परकीय वित्तसंस्थांनी बाजारातून १०३३८.७२ कोटी रुपयांची खरेदी केली. तर देशांतर्गत वित्त संस्थांनी ४४९६.०६ कोटी रुपयांची विक्री केली.
६.११ लाख कोटींनी श्रीमंत झाले गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजाराने सलग तिसऱ्या सप्ताहात वाढ नोंदवली आहे. त्यामुळे बाजाराचे एकूण भांडवल मूल्य ६ लाख ११ हजार ९७१.६२ कोटी रुपयांनी वाढले आहे. याचाच अर्थ गुंतवणूकदारांची मालमत्ता सहा लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक वाढलेली आहे.
बँकांनी दिलेल्या कर्जामध्ये वाढ होत आहे. अर्थव्यवस्था पुन्हा गतिमान होऊ लागल्याचे मानले जात आहे. आगामी काळात बँकांच्या समभागात तेजी दिसू शकते. आगामी सप्ताहात चीन व अमेरिकेतील घडामाेडींचा परिणाम शेअर बाजारावर दिसू शकताे.
या घटकांचा झाला परिणाम- देशातील उत्पादन तसेच सेवा क्षेत्राच्या पीएमआयमध्ये वाढ. अमेरिकेने व्याजदर वाढीबाबतचे आक्रमक धोरण टाकणार असल्याचे दिले संकेत - युरोपियन बँकेने व्याजदरामध्ये पाऊण टक्के केलेली वाढ, जीएसटीचे वाढलेले संकलन. विविध कंपन्यांचे जाहीर झालेले सकारात्मक निकाल