Join us

३६० अंकांनी घसरल्यानंतर सेन्सेक्सची १५०० अंकांची झेप; 'ही' आहेत तेजीची ५ कारणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 16:59 IST

share market : आज भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली. या वाढीमागे १-२ नाही तर ५ कारणे होती. त्यामुळे सकाळी घसरलेला बाजार बंद होईपर्यंत १५०० अंकांनी वधारला.

share market : काल (बुधवार) अमेरिकन शेअर बाजारात घसरण झाल्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारातही सुरुवातील पाहायला मिळाला. पण सकाळच्या घसरणीनंतर, शेअर बाजाराने शानदार पुनरागमन केले. निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये एकतर्फी जबरदस्त वाढ झाली. सेन्सेक्स १,५०० पेक्षा जास्त अंकांनी वधारला आणि निफ्टीने २३,८०० ची महत्त्वाची पातळी पुन्हा मिळवली. जागतिक बाजारपेठेतील तेजी आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून खरेदीमुळे ही वाढ झाली. याशिवाय, इतर काही कारणे देखील आहेत जी जाणून घेणे महत्वाचे आहे. पण, प्रश्न असा आहे की ही तेजी भविष्यातही कायम राहील का?

कशी राहिली बाजाराची स्थिती? :गुरुवारी दिवसभराच्या कामकाजानंतर, सेन्सेक्स १५०९ अंकांच्या वाढीसह ७८,५५३ वर बंद झाला. निफ्टी ४१४ अंकांच्या वाढीसह २३,८५२ वर बंद झाला. निफ्टी बँकेतही १,१७२ अंकांची वाढ झाली आणि तो ५४,२९० च्या पातळीवर बंद झाला. निफ्टी मिडकॅप निर्देशांक ३१२ अंकांच्या वाढीसह ५२,६५८ वर बंद झाला. या वाढीमध्ये वित्तीय, वाहन आणि तेल-वायू क्षेत्रातील शेअर्सनी महत्त्वाची भूमिका बजावली. भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, ग्रासिम, सन फार्मा आणि झोमॅटो सारख्या मोठ्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली.

शेअर बाजारातील तेजीचे कारण काय? :या वाढीमागे १-२ नाही तर ५ कारणे आहेत. प्रथम, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) सलग दुसऱ्या दिवशी खरेदी करत आहेत. बुधवारी, एफआयआयनी ३,९३६ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले, तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी (डीआयआय) २,५१३ कोटी रुपयांचे शेअर्स विकले.

दुसरे कारण म्हणजे रुपयाची ताकद. सलग चौथ्या दिवशी डॉलरच्या तुलनेत रुपया १० पैशांनी वाढून ८५.५४ वर पोहोचला. जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक भावना देखील वाढीचे एक कारण होते. दक्षिण कोरियाचा कोस्पी १ टक्क्यांहून अधिक, जपानचा निक्केई १.३२ टक्क्यांहून अधिक आणि हाँगकाँगचा हँग सेंग १ टक्क्यांहून अधिक वधारला. अमेरिकन बाजारांचे फ्युचर्स देखील हिरव्या चिन्हावर होते, त्यामुळे तिथेही चांगली सुरुवात अपेक्षित आहे.

तज्ञांचा असा विश्वास आहे की एफआयआय देशांतर्गत वापराशी संबंधित मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदी करणे सुरू ठेवू शकतात. याशिवाय, येत्या काही महिन्यांत भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार होण्याची शक्यता असल्याने बाजाराला पाठिंबा मिळाला आहे. जर हा करार झाला तर अमेरिका-चीन व्यापार युद्धाच्या काळात भारतीय निर्यातदारांना नवीन संधी मिळू शकतात.

वाचा - कोल इंडियापासून एलआयसीपर्यंत.. सरकार विकणार 'या' ४ कंपन्यांमधील हिस्सा; कशी आहे प्रक्रिया?

या स्टॉकना सर्वाधिक फायदा :आज एनएसईच्या शेअर्समध्ये सर्वाधिक ४० टक्के वाढ फ्यूजन फायनान्समध्ये नोंदली गेली. यानंतर, SECMARK CONSULTANCY २० टक्क्यांनी, OSWAL GREENTECH १७ टक्क्यांनी, SMS LIFESCIENCES १५ टक्क्यांनी आणि OSWAL AGRO MILLS १३ टक्क्यांनी वाढले.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारनिर्देशांकगुंतवणूकटॅरिफ युद्ध