Join us

झिरोधाकडून युजर्स आणि गुंतवणूकदारांना धोक्याचा इशारा! लाखो लोकांची झालीय फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2024 11:12 AM

Zerodha Alert : ब्रोकिंग फर्म झिरोधाने आपल्या वापरकर्त्यांना आणि लाखो गुंतवणूकदारांना सावधानतेचा इशारा दिला आहे. या प्रकरणात अनेक लोकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

Zerodha Alert : तुम्ही शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी एक धोक्याचा इशारा आहे. प्रसिद्ध शेअर ब्रोकिंग ॲप झिरोधाने (Zerodha) आपल्या ग्राहकांना आणि शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांसाठी हा अलर्ट जारी केला आहे. लोगोचे नाव वापरून बनावट वेबसाइट, ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि ट्रेडिंग अ‍ॅप्सद्वारे गुंतवणुकीचा सल्ला दिला जातोय. त्याबदल्यात लोकांकडून पैसे उकळले जात असल्याचे झिरोदाने एका प्रसिद्धपत्रकाद्वारे सांगितले आहे. झिरोधा अशा प्रकारे कोणताही सल्ला देत नाही. त्यामुळे अशा वेबसाइट्स, ट्रेडिंग अ‍ॅप्स, व्हॉट्सॲप ग्रुप्स आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मपासून दूर राहण्याचा सल्ला कंपनीने दिला आहे. काय आहे प्रकरण?बनावट वेबसाईट्स चालवणारे लोक झिरोधाचे कर्मचारी किंवा अधिकारी असल्याचे भासवून लोकांना गुंतवणुकीचा सल्ला देता आहेत. त्याबदल्यात मोठी फी वसूल करतायेत. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर झिरोधाने ग्राहक आणि गुंतवणूकदारांना सावध केलं आहे. प्लॅटफॉर्म कोणत्याही प्रकारे गुंतवणुकीचा सल्ला किंवा त्यासाठी पैसे आकारत नसल्याचे स्पष्ट केलं आहे. झिरोधा गुंतवणूकदारांना कोणत्याही प्रकारच्या स्टॉक टिप्स किंवा पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा प्रदान करत नाही.

झिरोधाचे ग्राहकांना आवाहनझिरोधाने गुंतवणुकदारांना सांगितले आहे की अशा प्रकरणांमध्ये झालेल्या नुकसानास ब्रोकिंग फर्म जबाबदार राहणार नाही. अशा प्रकारे तुमच्याशी कोणी संपर्क साधला किंवा तुमची फसवणूक करत असेल तर त्यांनी legal@zerodha.com वर ब्रोकिंग फर्मकडे तक्रार करण्याचे आवाहन केलं आहे. झिरोधा ही देशातील आघाडीची डिस्काउंट ब्रोकर आहे. झिरोधाचे ऑगस्ट २०२४ पर्यंत ७२ लाख वापरकर्ते आहेत. ही ब्रोकिंग फर्म वेळोवेळी आपल्या गुंतवणूकदारांना शेअर बाजाराशी संबंधित बाबींबद्दल सतर्क करत असते.

(डिस्क्लेमर: शेअर बाजारात पैसे गुंतवणे हे बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहे, त्यामुळे कोणत्याही अनधिकृत प्लॅटफॉर्मच्या सांगण्यावरून बाजारात पैसे गुंतवू नका. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया प्रमाणित गुंतवणूक व्यावसायिकांचा सल्ला घ्या.) 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक