Share Markets : सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठा भूकंप आला होता. यामध्ये छोटे गुंतवणूकदारच नाही तर अंबानी-अदानी यांच्यासारख्या मोठ्या उद्योगपतीचंही मोठं नुकसान झालं होतं. शेअर बाजारातील कमजोर सुरुवातीनंतर मंगळवारी झालेल्या जबरदस्त रिकव्हरीने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. कालच्या मोठ्या घसरणीनंतर बाजारात तोटा कायम राहणार असे वाटत होते. मात्र, आज बाजाराने सुरुवातीला रिकव्हरी दाखवली. त्यानंतर अचानक खालच्या स्तरावरुन चांगली रिकव्हरी आली. शॉर्ट कव्हरिंग आणि निफ्टी २१७ अंकांच्या वाढीमुळे २४,२१३ वर बंद झाला. सेन्सेक्स ६९४ अंकांनी वाढून ७९,४७६ वर आणि निफ्टी बँक ९९२ अंकांनी वाढून ५२,२०७ वर बंद झाला.
निफ्टीवर धातू, वित्तीय आणि बँकिंग शेअर्ससह वाहन क्षेत्र निर्देशांकात चांगली वाढ झाली. जेएसडब्ल्यू स्टील, हिंदाल्को, टाटा स्टील आणि बजाज ऑटो यांनी सर्वाधिक वाढ नोंदवली. दुसऱ्या तिमाहीत ग्लँड फार्मा, टिळकनगर इंडस्ट्रीज, माझगाव डॉक आणि आमरा राजा या शेअर्समध्ये जबरदस्त हालचाल झाली. कोल इंडिया, अदानी पोर्ट्स, डिव्हिस लॅब आणि एशियन पेंट्स यांनी निफ्टीमध्ये सर्वात मोठी घसरण नोंदवली.
मागील सत्राच्या बंदच्या तुलनेत सेन्सेक्स २४० अंकांनी घसरला आणि ७८,५४२ वर उघडला. निफ्टी ७९ अंकांनी घसरून २३,९१६ वर उघडला. तर बँक निफ्टी १६३ अंकांनी घसरून ५१,०५२ वर उघडला. चलन बाजारात, रुपया १ पैशांनी मजबूत होऊन ८४.१२ प्रति डॉलरवर उघडला.
आशियाई बाजारात जपानचा निक्की, चीनचा शांघाय कंपोझिट आणि हाँगकाँगचा हँग सेंग नफ्यात तर दक्षिण कोरियाचा कोस्पी तोट्यात होता. सोमवारी अमेरिकन बाजार नकारात्मक ट्रेंडसह बंद झाले. आंतरराष्ट्रीय मानक ब्रेंट क्रूड 0.12 टक्क्यांच्या वाढीसह प्रति बॅरल 75.17 डॉलरवर पोहोचले. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदार (FII) सोमवारी विक्री करणारे होते. त्यांनी एकूण ४,३२९.७९ कोटी रुपयांचे शेअर्स विकले.