Join us  

दररोज घसतोय Ola Electricचा शेअर; ₹१०० च्या खाली आला भाव; काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2024 8:42 AM

Ola Electric Share Price : इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी ओला इलेक्ट्रिकचे शेअर्स पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी चर्चेत येण्याचे कारण वेगळंच आहे.

Ola Electric Share Price : इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी ओला इलेक्ट्रिकचे शेअर्स पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी चर्चेत येण्याचे कारण म्हणजे शेअर्समध्ये सातत्यानं होत असलेली घसरण आहे. याआधी ऑगस्टमध्ये कमकुवत लिस्टिंगनंतर ओलाच्या शेअर्समध्ये प्रचंड तेजी आली होती. पण आता घसरणीचा ट्रेंड सुरू झाला आहे. २० ऑगस्ट रोजी कंपनीच्या शेअर्सनं १५७.५३ रुपयांची उच्चांकी पातळी गाठली होती, त्यानंतर किंमतीत ३० टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.

शुक्रवारी ४.५ टक्क्यांची घसरण

शुक्रवारी ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचा शेअर ४.५० टक्क्यांनी घसरला, त्यानंतर तो ९५.३९ च्या नीचांकी पातळीवर पोहोचला. मात्र, त्यानंतर तो ९९.०९ च्या पातळीवर बंद झाला आहे. कंपनीच्या मार्केट कॅपबद्दल बोलायचे झाले तर ते ४३,६७७ कोटी रुपये आहे. ओला इलेक्ट्रिकचा शेअर गेल्या पाच आठवड्यात पाच टक्क्यांहून अधिक घसरलाय, तर एका महिन्यात तो १० टक्क्यांनी घसरला.

काय म्हणाले एक्सपर्ट?

ओला इलेक्ट्रिकचे शेअर्स सध्या ओव्हरसोल्ड एरियामध्ये ट्रेड करत आहेत आणि शेअर्समध्ये सध्याच्या पातळीवरून पुन्हा तेजी दिसू शकते. मात्र, कोणतीही नवीन पोझिशन तयार करू नका, असा सल्ला एका तज्ज्ञानं ईटी नाऊ स्वदेशवर बोलताना दिला. ओलाचे शेअर्स ७६ रुपयांच्या आयपीओ इश्यू प्राइसकडे गेल्यास गुंतवणूकदारांनी खरेदीचा विचार करावा, असंही ते म्हणाले.

१३ दिवसांत पैसे दुप्पट

७ ऑगस्ट २०२४ रोजी ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या शेअर्समध्ये फ्लॅट लिस्टिंग झालं होतं. शेअरचं लिस्टिंग ७६ रुपयांच्या इश्यू प्राइसएवढी असली तरी सेकंडरी मार्केटमध्ये शेअर्स २० टक्क्यांच्या तेजीसह बंद झाले. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत ४४ टक्के परतावा दिला. २० ऑगस्ट रोजी शेअर १५७.४० रुपयांच्या पातळीवर पोहोचला आणि आजवरचा उच्चांक गाठला. म्हणजेच १३ दिवसांत शेअर्सने गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले होते. त्यानंतर कंपनीचे शेअर्स तेजीत आले होते.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :व्यवसायओलाशेअर बाजार