Adani Group Stock: अदानी समुहाची आघाडीची कंपनी अदानी पोर्ट्सच्या शेअरच्या (Adani Ports Share) किमतीत आज 5 टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली. त्यानंतर कंपनीचे शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले. सकाळी बीएसईमध्ये कंपनीच्या शेअर्सची किंमत 1229.90 रुपयांच्या पातळीवर पोहोचली होती. ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल अदानी समूहाच्या या कंपनीवर बुलिश आहेत.
मंगळवारी बीएसईवर कामकाजादरम्यान अदानी पोर्ट्सचे शेअर्स 1184.05 रुपयांच्या पातळीवर उघडले. मात्र काही वेळाने हा शेअर 5.23 टक्क्यांच्या उसळीसह 1229.90 रुपयांच्या पातळीवर पोहोचला. स्टॉक मार्केटमध्ये अदानी पोर्ट्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 394.95 रुपये आहे. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 18 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
यामुळे आली तेजी
अदानी पोर्ट्सच्या शेअरच्या किमती वाढण्यामागे बाँड मार्केट हे कारण मानलं जात आहे. अदानी पोर्ट्सनं गेल्या 2 वर्षांत पहिल्यांदाच सोमवारी बॉन्ड्स जारी केले. कंपनीच्या बॉन्ड्सना चांगली मागणी दिसून आली आहे. कंपनीनं 500 कोटी रुपयांच्या 2 लिस्टेड बाँन्डसाठी बोली स्वीकारल्या आहेत. त्यापैकी एक 5 वर्षात आणि दुसरा 10 वर्षात मॅच्युअर होईल. त्यांचे दर अनुक्रमे 7.80 टक्के आणि 7.90 टक्के असतील.
ब्रोकरेज हाऊस बुलिश
देशांतर्गत ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल या शेअरवर बुलिश दिसून येत आहेत. ब्रोकरेज फर्मच्या म्हणण्यानुसार 2030 पर्यंत अदानी पोर्ट्स जगातील सर्वात मोठी पोर्ट ऑपरेट करणारी खाजगी कंपनी बनेल. डिसेंबर तिमाहीत अदानी पोर्ट्सच्या व्हॉल्यूम वाढीत वार्षिक आधारावर 42 टक्के वाढ झाली आहे.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरी विषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)