Join us  

२८ रुपयांपार गेला अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर, ९९ टक्क्यांनी घसरून १ रुपयांवर आलेला Stock

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 3:36 PM

घसरत्या बाजारातही अनिल अंबानी यांच्या या कंपनीच्या शेअरला अपर सर्किट लागलं आहे. या शेअरमध्ये आता पुन्हा एकदा तेजी दिसून येतेय.

अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा मोठी तेजी दिसून येत आहे. घसरत्या बाजारातही रिलायन्स पॉवरचा शेअर ५ टक्क्यांनी वधारून २८.२६ रुपयांवर पोहोचला. ९९ टक्क्यांनी घसरल्यानंतर रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये गेल्या साडेचार वर्षांत प्रचंड वाढ झाली आहे. कंपनीचे शेअर्स १ रुपयांवरून २८ रुपयांवर गेले आहेत. या काळात रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये २४०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली. तसंच रिलायन्स पॉवर आता पूर्णपणे कर्जमुक्त झाली आहे.

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवरचा शेअर २३ मे २००८ रोजी २७४.८४ रुपयांवर होता. यानंतर कंपनीचा शेअर २७ मार्च २०२० रोजी या पातळीवरून ९९ टक्क्यांहून अधिक घसरून १.१३ रुपयांवर आला. गेल्या साडेचार वर्षांत रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झालीये. २७ मार्च २०२० रोजी कंपनीचा शेअर १.१३ रुपयांवर होता. 

रिलायन्स पॉवरचा शेअर २४ जुलै २०२४ रोजी २८.२६ रुपयांवर पोहोचला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदारानं २७ मार्च २०२० रोजी रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती तर या शेअर्सची किंमत सध्या २५ लाख रुपये झाली असती.

रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये गेल्या २ वर्षात १४० टक्के वाढ झाली आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर्स ११ रुपयांवरून २८ रुपयांवर गेले आहेत. गेल्या वर्षभरात रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये ८० टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ३४.३५ रुपये आहे. तर कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी १५.५३ रुपये आहे.

कर्जमुक्त झालीये कंपनी

रिलायन्स पॉवर आता स्वतंत्र तत्त्वावर पूर्णपणे कर्जमुक्त झाली आहे. पीटीआयच्या वृत्तात सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार कंपनीनं आपली संपूर्ण थकबाकी भरली आहे. कंपनीवर सुमारे ८०० कोटी रुपयांचे कर्ज होते, ते बँकांना फेडण्यात आलंय. डिसेंबर २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत रिलायन्स पॉवरनं आयडीबीआय बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक आणि डीबीएससह अनेक बँकांशी डेट सेटलमेंट करार केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीनं आता या बँकांचे संपूर्ण कर्ज फेडलं आहे.

(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा किंवा जाणकारांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :अनिल अंबानीशेअर बाजार