Join us

भारतातील सर्वात मोठ्या शिपिंग कंपनीच्या शेअरमध्ये तेजी, १३ टक्क्यांनी वाढ; तुमच्याकडे आहे का शेअर?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 2:17 PM

SCI Share Price: या कंपनीच्या शेअर्समध्ये आज १३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. गुंतवणूकदारांकडून आज यात जोरदार खरेदी दिसून आली.

SCI Share Price: भारतातील सर्वात मोठी शिपिंग कंपनी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (SCI Share Price) शेअर्समध्ये आज १३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. गुंतवणूकदारांकडून आज यात जोरदार खरेदी दिसून आली. शिपिंग कंपनीच्या ताफ्यात ३२ टँकर, १५ बल्क वाहक, २ लाइनर, १० ऑफशोर सप्लाय वेसल्ससह ५९ जहाजांचा ताफा आहे. एससीआयमधून वेगळ्या झालेल्या एससीआय लँड अॅसेट्स या युनिटच्या शेअर्समध्येही जोरदार खरेदी दिसून येत आहे. यामध्ये आज ६% पेक्षा जास्त वाढ झाली.

नफ्यात अनेक मोठी वाढ

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा एकत्रित निव्वळ नफा सप्टेंबर तिमाहीत अनेक पटींनी वाढून २९१.४४ कोटी रुपये झाला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत ६५.७३ कोटी रुपये होता. सप्टेंबर तिमाहीत एससीआयचं उत्पन्न वाढून १,४९१.२३ कोटी रुपये झालंय, जे गेल्या वर्षी १,१६१.८९ कोटी रुपये होतं.

शिपिंग कंपनीनंही या निकालानंतर आपल्या भागधारकांना प्रति शेअर ०.५० रुपये लाभांश जाहीर केला आहे. या तेजीमुळे एससीआयच्या शेअर्सनी गेल्या महिन्याभरात झालेली घसरण भरून काढली आहे. एससीआय ही सर्वात मोठी शिपिंग कंपनी आहे आणि एलएनजी वाहतुकीच्या व्यवसायात एकमेव भारतीय खेळाडू आहे.

एससीआयच्या प्रस्तावित धोरणात्मक निर्गुंतवणुकीबाबत अधिक माहिती देताना व्यवस्थापनाने सांगितलं की, पात्र इच्छुकांकडून योग्य ती तपासणी सुरू आहे. या विक्रीतून सरकारी तिजोरीत सुमारे तीन हजार कोटी रुपये येण्याची शक्यता आहे. केंद्राने एससीआयच्या रिअल इस्टेट आणि इतर नॉन-कोअर मालमत्तांना एससीआय लँड असेट्समध्ये विभाजन केलं होतं. एससीआयमधील भागविक्री या वर्षी पूर्ण होणं अपेक्षित आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

 

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक