Join us  

Gold-Silver Stocks : सरकारचा एक निर्णय, गुंतवणूकदारांची 'चांदी'; 'या' कंपन्यांच्या शेअर्सना 'सोन्याचे' दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 12:06 PM

Gold-Silver Stocks in Focus: अर्थसंकल्प २०२४ मध्ये सोन्या-चांदीवरील सीमा शुल्क कमी करण्याच्या घोषणेनंतर या कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे. पाहा कोणते आहेत हे शेअर्स?

Gold-Silver Stocks in Focus: अर्थसंकल्प २०२४ मध्ये सोन्या-चांदीवरील सीमा शुल्क कमी करण्याच्या घोषणेनंतर कल्याण ज्वेलर्स, पीसी ज्वेलर्स, सेन्को गोल्ड आणि टायटनचे शेअर्स बुधवारी ९ टक्क्यांनी वधारले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोन्या-चांदीवरील सीमा शुल्क १० टक्क्यांवरून ६ टक्क्यांवर आणण्याची घोषणा केली आहे. याशिवाय प्लॅटिनमवरील सीमा शुल्क ६.४ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.

अर्थसंकल्पातील या घोषणेनंतर गुंतवणूकदारांमध्ये सोने, चांदी आणि प्लॅटिनम दागिने विकणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी खरेदी दिसून येत आहे. मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात ३००० रुपयांनी घसरण झाली. पीसी ज्वेलर्सच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. कंपनीचा शेअर आता ७७.८४ रुपयांवर पोहोचला आहे. अपर सर्किटनंतर शेअर ५२ आठवड्यांच्या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचला. त्याचा ५२ आठवड्यांतील नीचांकी स्तर २५.४५ रुपये आहे.

सकाळच्या सुमारास कल्याण ज्वेलर्सचा शेअर ६.४३ टक्क्यांनी वधारून ५८८.९५ रुपयांवर व्यवहार करत होता. यामध्ये जवळपास ९ टक्क्यांची वाढ झाली आणि शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर ६३३.६० रुपयांवर पोहोचला होता.

सेन्कोच्या शेअर्समध्येही वाढ

याशिवाय सेन्को गोल्डच्या शेअर वधारून ९९८ रुपयांच्या आसपास व्यवहार करत होता. आज तो ९८५ रुपयांवर उघडला. शेअरचा ५२ आठवड्यांतील उच्चांकी दर १७७७ रुपये आणि नीचांकी ३६५ रुपये आहे. टायटनचा शेअरही आज ३४७० रुपयांवर उघडल्यानंतर ३५५२.५० रुपयांवर पोहोचला. 

मणप्पुरमच्या शेअर्समध्येही तेजी

गोल्ड लोन कंपनी मणप्पुरम फायनान्सच्या शेअर्समध्येही आज तेजी दिसून आली. कामकाजादरम्यान शेअर साडेतीन टक्क्यांनी वधारून सुमारे २१० रुपयांवर व्यवहार करत होता. एकूण १५ एक्सपर्टपैकी १४ एक्सपर्ट्सनं खरेदीचा सल्ला दिला आहे. यापैकी १० कंपन्यांनी स्ट्राँग बाय रेटिंग दिलंय तर चार कंपन्यांनी बाय रेटिंग दिलं आहे. एकानं विक्रीचा सल्ला दिला आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक