मॅंगनीजचे उत्पादन आणि विक्रीशी संबंधित एका कंपनीनं गेल्या काही वर्षांत आपल्या ग्राहकांना जबरदस्त परतावा दिला आहे. ही सार्वजनिक क्षेत्रातील (PSU) कंपनी मॉइल लिमिटेड (MOIL Limited) आहे. आठवड्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी बीएसईवर इंट्राडे ट्रेडिंगदरम्यान मॉइल लिमिटेडच्या शेअर्सने १९% वाढीसह आतापर्यंतचा विक्रमी उच्चांक गाठला. कंपनीच्या शेअर्सनं गेल्या १ वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. या वाढीमागे कंपनीचे आर्थिक वर्ष २०२४ चे मार्च तिमाहीचे निकाल कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. शुक्रवारी कंपनीचा शेअर १९.९९ टक्क्यांच्या तेजीसह ८७.४० रुपयांनी वधारून ५२४.६० रुपयांवर बंद झाला.
अशी होती कामगिरी
चालू आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा १२.६ टक्क्यांनी वाढून ९१ कोटी रुपये झाला आहे. तर गेल्या वर्षी याच कालावधीत तो ८१ कोटी रुपये होता. कामकाजातून मिळणारे उत्पन्न २.८ टक्क्यांनी कमी होऊन ४१६ कोटी रुपयांवर आले आहे, जे गेल्या वर्षी याच कालावधीत ४२८ कोटी रुपये होते. मार्जिन गेल्या वर्षीच्या ३१ टक्क्यांवरून ३०.८ टक्क्यांवर आले आहे. कंपनीच्या कामगिरीला मुख्यत्वे धातूच्या वाढत्या किमती तसंच मजबूत विक्री, उत्पादन कारणीभूत आहे.
गुंतवणूकदारांना मिळणार लाभांश
दुसरीकडे, कंपनीच्या संचालक मंडळाच्या सदस्यांनी प्रत्येकी १० रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या इक्विटी शेअरमागे २.५५ रुपये लाभांश जाहीर केला आहे. मात्र, लाभांशाची विक्रमी तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. गेल्या १ वर्षात कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना २३०.२% बंपर परतावा दिला आहे. मॉइल लिमिटेडचा शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर म्हणजेच ५२४.६० रुपयांवर पोहोचला. तर शेअरचा ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी १५१.५० रुपये आहे. तर या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीचे मार्केट कॅप १०,६७४.८३ कोटी रुपये आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)