Join us

एका झटक्यात १७ टक्क्यांपर्यंत वाढला Sula Vineyards चा शेअर, वर्षभराच्या उच्चांकी स्तरावर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2024 11:25 AM

८ जानेवारी रोजी सुला विनयार्ड्सच्या शेअर्समध्ये बंपर वाढ झाली. पाहा काय आहे कारण?

8 जानेवारी रोजी सुला विनयार्ड्सच्या शेअर्समध्ये बंपर वाढ झाली. या शेअरमध्ये कामकाजादरम्यान 17 टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली आणि 52 आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. या वाढीमागील मुख्य कारण म्हणजे जागतिक ब्रोकरेज फर्म CLSA नं स्टॉकला दिलेलं 'बाय' रेटिंग आणि टार्गेट प्राईजमध्ये झालेली वाढ. 

8 जानेवारी रोजी, ब्रोकरेजच्या उत्साही भूमिकेमुळे बीएसईवर सुला विनयार्ड्सचे शेअर्स 583 रुपयांच्या वाढीसह उघडले. काही क्षणांतच, मागील बंद किंमतीपेक्षा ते सुमारे 17 टक्क्यांनी वाढले आणि 648.75 रुपयांच्या नव्या 52 आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले. 

सीएलएसएनं सुला शेअर्सचं टार्गेट प्राईज 863 रुपये प्रति शेअर केलं आहे. यापूर्वी या शेअरचे टार्गेट प्राईज 571 रुपये प्रति शेअर होते. नवीन टार्गेट प्राईज शेअरच्या मागील बंद किंमतीपेक्षा सुमारे 42 टक्के अधिक आहे. याचा अर्थ ब्रोकरेजला स्टॉकमध्ये लवकरच 42 टक्के वाढ अपेक्षित आहे. सुला विनयार्ड्सच्या शेअर्समध्ये गेल्या एका महिन्यात 17 टक्क्यांची वाढ झाली आहे.

काय म्हटलंय ब्रोकरेजनं?

या स्टॉकमध्ये भरपूर क्षमता असल्याचा विश्वास सीएलएसएनं व्यक्त केलाय. महाराष्ट्र सरकारनं 5 वर्षांहून अधिक काळ राज्यात उत्पादित आणि विकल्या जाणाऱ्या वाईनवरील अनुदान सुरू केलं आहे. यामुळे सुलाला सर्वाधिक फायदा होईल अशा व्हॉल्यूमच्या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं पाहिजे. याचे कारण असे की वाईनमध्ये कंपनीचा बाजारातील हिस्सा 50 टक्क्यांहून अधिक आहे. महाराष्ट्र सरकारच्या वाईन इंडस्ट्रियल प्रमोशनल स्कीमनुसार, ज्या वाईनरींनी गेल्या 3 आर्थिक वर्षांमध्ये (2020-21 ते 2022-23) 20 टक्के व्हॅट भरला आहे त्यांना या कालावधीसाठी कर परतावा दिला जाईल. या आर्थिक वर्षापासून वायनरींना महाराष्ट्रातील एकूण वाईन विक्रीच्या 20 टक्के व्हॅट राज्य सरकारला भरावा लागेल.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. यामधील मतं ही ब्रोकरेजची वैयक्तीक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजार