मॅगी उत्पादक कंपनी नेस्ले इंडियाचे (Nestle India) शेअर आता स्वस्त झाले आहेत. नेस्लेच्या शेअरच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे. आता किरकोळ गुंतवणूकदार यात सहज गुंतवणूक करू शकतात. कंपनीनं अलीकडेच आपला स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली होती. नेस्लेच्या स्टॉकच्या स्प्लिटची रेकॉर्ड तारीख 5 जानेवारी 2024 निश्चित करण्यात आली होती.
नेस्ले इंडियाची भारतातील सर्वात महागड्या शेअर्समध्ये गणना केली जाते. आतापर्यंत नेस्ले इंडियाच्या एका शेअरची किंमत 27,116.40 रुपये होती. आता या कंपनीचे शेअर्स 10 भागांमध्ये विभागले गेले आहेत. दरम्यान, शुक्रवारी नेस्ले इंडियाचा शेअर 2,668.10 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. दरम्यान बीएसईवर नेस्ले इंडियाची शुक्रवारची इंट्राडे नीचांकी पातळी 2644 रुपये प्रति शेअर होती.
पोर्टफोलियोत वाढणार शेअर्स
फर्मचे शेअर्स 1:10 च्या प्रमाणात स्प्लिट झाले आहेत. याचा अर्थ असा की रेकॉर्ड तारखेनुसार तुम्ही नेस्ले इंडियाचा 1 शेअर असल्यास स्प्लिटनंतर तुमच्याकडे 10 शेअर्स असतील. त्याच वेळी, जर तुमच्याकडे नेस्लेचे 10 शेअर्स असतील तर ते 100 शेअर्स होतील. विभाजनापूर्वी नेस्ले इंडियाच्या एका शेअरची किंमत सुमारे 27,116.40 रुपये होती. हा भारतातील सहाव्या क्रमांकाचा महागडा स्टॉक होता. आता देशातील महागड्या शेअर्समध्ये फक्त एमआरएफ लिमिटेड, पेज इंडस्ट्रीज, हनीवेल ऑटोमेशन, 3एम इंडिया आणि श्री सिमेंटचे आहेत.
फेस व्हॅल्यू झाली कमी
शेअरच्या या स्प्लिटनंतर कंपनीची फेस व्हॅल्यू प्रति शेअर 1 रुपये इतके खाली आली आहे. कंपनीने शेअर बाजाराला यापूर्वीच माहिती देत 10 रुपये फेस व्हॅल्यू असलेला शेअर 10 भागांमध्ये स्प्लिट केला जाणार असल्याचं म्हटलं होतं. यासाठी 5 जानेवारी 2024 ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली होती.
नेस्ले इंडियानं शेअर बाजाराला शेअर स्प्लिटची माहिती दिल्यापासून शेअरच्या किमतीत १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. रिपोर्टनुसार, कंपनीमध्ये प्रवर्तकांचा हिस्सा 60 टक्क्यांहून अधिक आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत म्युच्युअल फंडाच्या शेअर होल्डिंगमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्याचबरोबर जून आणि सप्टेंबरमध्ये विदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा कमी झाला आहे.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)