Govt. Bank Stocks Crash: सरकारी क्षेत्रातील पंजाब अँड सिंध बँकेचे शेअर्स मंगळवारी, १ एप्रिल रोजी २० टक्क्यांनी घसरले, तर युको बँकेचे शेअर्सही जवळपास ७ टक्क्यांनी घसरले. पंजाब अँड सिंध बँकेनं शुक्रवारी क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट (क्यूआयपी) अंतर्गत १,२१९ कोटी रुपये उभे केले. यातील बहुतांश शेअर्स एलआयसी आणि एसबीआय लाइफ इन्शुरन्सला देण्यात आले. त्याचप्रमाणे युको बँकेनंही आपला क्यूआयपी पूर्ण केला असून बहुतांश शेअर्स एलआयसी आणि एसबीआयसमर्थित फंडांना देण्यात आलेत. सीएनबीसी-टीव्ही १८ च्या रिपोर्टनुसार, या पीएसयू बँकांनी क्यूआयपीद्वारे उभारलेल्या ६ हजार कोटी रुपयांपैकी २५% योगदान एलआयसीनं दिलंय.
सरकारी हिस्सा आणि एमपीएस नियम
सेबीचे अध्यक्ष तुहिन कांत पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही पीएसयू कंपन्यांना मिनिमम पब्लिक शेअरहोल्डिंग (MPS) नियम पूर्ण करणे अवघड होईल. पंजाब अँड सिंध बँकेत सरकारचा हिस्सा डिसेंबरपर्यंत ९८.२५ टक्के होता.
म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील 'हा' छुपा खर्च माहितीये का? नफ्यावर थेट होतो परिणाम
शेअर्स आपटले
पंजाब अँड सिंध बँकेचा शेअर आज १९.२ टक्क्यांनी घसरून ३५.२३ रुपयांवर पोहोचला, जो याचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर आहे. ही किंमत क्यूआयपी इश्यू किंमत ३८.३७ रुपयांपेक्षाही कमी आहे. सकाळी साडेदहाच्या सुमारास आयओबी दोन टक्क्यांनी घसरून ३८.१९ रुपयांवर व्यवहार करत होता. इंडियन बँक, युनियन बँक, सेंट्रल बँक यांचे शेअर्स एक टक्क्यांहून अधिक घसरले. बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, पीएनबी आणि बँक ऑफ बडोदा यांच्या शेअर्समध्येही घसरण दिसून आली.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)