Stock Market Opening: अमेरिकेतून येणाऱ्या निवडणूक निकालाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होण्याची चिन्हं दिसून येत आहेत. यानंतर अमेरिकी बाजारातील डाऊ फ्युचर्स ५६० अंकांच्या वाढीसह व्यवहार करत होता. दुसरीकडे यामुळे भारतीय बाजारातही तेजी दिसून येत आहे. ट्रम्प यांचे राष्ट्राध्यक्ष होण्याच्या न्यूयॉर्क टाइम्सच्या स्पष्ट इशाऱ्याचा अमेरिकेच्या शेअर बाजाराला सपोर्ट मिळत असून यामुळे भारताच्या शेअर बाजारालाही चालना मिळत आहे.
आयटी निर्देशांकात मोठी वाढ
आयटी इंडेक्स ५१३ अंकांच्या वाढीसह ४०,९२५ च्या पातळीवर व्यवहार करताना दिसतोय. शेअर्समध्ये एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्राच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून येत आहे. आज इन्फोसिसमध्येही तेजी दिसून येत आहे. कामकाजाच्या सुरुवातीला बीएसई सेन्सेक्स २९५.१९ अंकांच्या वाढीसह ७९,७७१ वर तर एनएसई निफ्टी ९५.४५ अंकांनी वधारून २४,३०८ च्या पातळीवर उघडला.
बँक निफ्टी वधारला
बँक निफ्टी २३३ अंकांनी म्हणजेच ०.४० टक्क्यांनी वधारून ५२,४४० च्या पातळीवर पोहोचला. कालच्या बाजारात बँक निफ्टी ९९२ अंकांच्या वाढीसह बंद झाला. बँक निफ्टीमध्येही आज सकाळी जोरदार तेजी पाहायला मिळत आहे.
सेक्टोरल इंडेक्स अपडेट
सेक्टोरल इंडेक्समध्ये आज केवळ मेटल निर्देशांकात घसरण दिसून येत असून तो रेड झोनमध्ये आहे. आयटी, रियल्टी आणि ऑईल अँड गॅस क्षेत्रात सर्वाधिक वाढ दिसून येतेय. यापैकी रियल्टी निर्देशांक २ टक्क्यांहून अधिक तर आयटी १.२४ टक्क्यांनी वधारले आहे. ऑईल आणि गॅस क्षेत्रात १.०४ टक्क्यांची वाढ दिसून येत आहे.