Join us

सोलार पॉवरची मिळाली मोठी ऑर्डर, या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी; ४ वर्षात १४०००%  तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 3:49 PM

गुजरातच्या या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली आहे. ही कंपनी सोलार आणि हायब्रिड पॉवर जनरेशनचं काम करते.

गुजरातच्या केपीआय ग्रीन एनर्जी या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली आहे. ही कंपनी सोलार आणि हायब्रिट पॉवर जनरेशनचं काम करते. केपीआय ग्रीन एनर्जीचे शेअर्स शुक्रवारी 5 टक्क्यांच्या अपर सर्किटसह 1479.15 रुपयांवर पोहोचले. कंपनीला मोठी ऑर्डर मिळाल्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ झाली आहे. केपीआय ग्रीन एनर्जीच्या उपकंपनीला 1.5 मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प मिळाला आहे. केपीआय ग्रीन एनर्जीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 1618.71 रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 259.16 रुपये आहे. 

2024-25 मध्ये पूर्ण करायचाय प्रोजेक्ट 

KPI ग्रीन एनर्जीची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या केपीआयजी एनर्जीया प्रायव्हेट लिमिटेडला (KPIG Energia Private Limited) 1.5 MW सोलार पॉवर प्रोजक्टची ऑर्डर मिळाली आहे. हा प्रकल्प 2024-25 या आर्थिक वर्षात पूर्ण होणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, उपकंपनीला एथर इंडस्ट्रीजकडून 15 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पाची ऑर्डर मिळाली होती. दरम्यान, या वर्षी जानेवारीमध्ये केपीआय ग्रीन एनर्जीची उपकंपनी स्कायविन पेपर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडला 5 मेगावॅटची नवीन ऑर्डर आणि श्री वारुदी पेपर मिलकडून 5.60 मेगावॅटची ऑर्डर मिळाली होती. 

4 वर्षांत 14000 टक्क्यांची वाढ 

गेल्या काही वर्षांत केपीआय ग्रीन एनर्जीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या 4 वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 14000 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. 12 फेब्रुवारी 2020 रोजी कंपनीचे शेअर्स 10.42 रुपयांवर होते. KPI ग्रीन एनर्जीचे शेअर्स 16 फेब्रुवारी 2024 रोजी 1479.15 रुपयांवर पोहोचले. त्याच वेळी, गेल्या 3 वर्षांत, केपीआय ग्रीन एनर्जीचे शेअर्स सुमारे 7300 टक्क्यांनी वाढले आहेत. या काळात कंपनीचे शेअर्स 20 रुपयांवरून 1479.15 रुपयांपर्यंत वाढले. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 389 टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक