Join us  

अस्थिर बाजारात पैशांचे काय?

By प्रसाद गो.जोशी | Published: January 16, 2023 11:31 AM

परकीय वित्तसंस्थांकडून विक्रीचा मारा

प्रसाद गो. जोशी

विविध कंपन्यांचे येणारे आर्थिक निकाल आणि जगभरातील शेअर बाजाराचा रोख या सप्ताहामध्ये बाजाराची दिशा ठरविणार आहेत. मागील सप्ताहात बाजार अतिशय अस्थिर राहिला. त्यानंतर मात्र काही प्रमाणामध्ये बाजार वाढला आणि सप्ताहाच्या अखेरीस निर्देशांक वाढीव पातळीवर बंद झाले.

गतसप्ताहात बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३६०.८१ अंशांनी वाढून ६० हजार अंशांच्या पार गेला. सप्ताहाच्या अखेरीस तो ६०,२६१.१८ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)मध्ये सुमारे १०० अंशांची वाढ झाली. हा निर्देशांक १७९५८.६० अंशांवर बंद झाला. १८ हजार अंशांचा टप्पा पार करताना तो थोडक्यात राहिला. मिडकॅप आणि स्मॉल कॅप या निर्देशांकांमध्येही अतिशय अल्प वाढ दिसून आली.

सप्ताहाच्या अखेरीस महागाईची जाहीर झालेली आकडेवारी बाजाराला उभारी देणारी ठरली आहे. महागाईचा दर कमी झाल्याने  गुंतवणूकदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र, आगामी अर्थसंकल्पावर एक डोळा ठेवून व्यवहार होत असल्याने बाजार या महिनाअखेरपर्यंत अस्थिरच राहणार आहे. मात्र, त्यामध्ये वाढ- घट होतच राहण्याचा अंदाज आहे.

परकीय वित्तसंस्थांकडून विक्रीचा मारा

- गेले दोन महिने खरेदी करीत असलेल्या परकीय वित्त संस्थांनी जानेवारी महिन्याच्या पहिल्या १३ दिवसांमध्ये विक्रीचा सपाटा लावलेला दिसून आला. या महिन्यात या संस्थांनी १५,०६८ कोटी रुपयांची विक्री केली आहे.

- या संस्थांनी केवळ समभागच नव्हे तर बॉण्डसचीही विक्री केलेली दिसून आली आहे. याआधी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांमध्ये या संस्था भारतामध्ये खरेदी करताना दिसून आल्या.

टॅग्स :शेअर बाजार