Sri Chakra Cement share: शुक्रवारी शेअर बाजार विक्रीच्या स्थितीत असताना काही पेनी शेअर्समध्ये मात्र मोठी तेजी दिसून आली. असाच एक पेनी स्टॉक म्हणजे श्री चक्र सिमेंट. आठवड्याच्या अखेरच्या दिवशी हा पेनी शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांनी उड्या घेतल्या. ट्रेडिंग दरम्यान हा शेअर ४ रुपयांवरून २० टक्क्यांनी वधारून ४.८० रुपयांवर पोहोचला. शेअरचा हा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर आहे. तर शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ३ रुपये आहे.
बाजारात विक्रीचा सपाटा सुरू असताना श्री चक्र सिमेंटचे शेअर्स वधारले. शुक्रवारी अस्थिर सत्रात बीएसईचा ३० शेअर्सचा निर्देशांक २४१.३० अंकांनी घसरून ७७,३७८.९१ वर बंद झाला. सेन्सेक्सने दिवसभरात ७७,९१९.७० अंकांची उच्चांकी पातळी गाठली आणि ७७,०९९.५५ ची नीचांकी पातळी गाठली. त्यामुळे दिवसभरात ८२०.१५ अंकांची चढ-उतार पाहायला मिळाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ९५ अंकांनी घसरून २३,४३१.५० अंकांवर बंद झाला. त्यामुळे निफ्टी २३,५०० च्या मानसशास्त्रीय पातळीच्या खाली बंद झाला.
शेअरहोल्डिंग पॅटर्न
श्री चक्र सिमेंटच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नबद्दल बोलायचं झालं तर प्रवर्तकांकडे ५१.६१ टक्के हिस्सा आहे. तर, ४८.३९ टक्के हिस्सा सार्वजनिक भागधारकांकडे आहे. प्रवर्तकामध्ये केव्ही नागलिथा यांची २८.१६ टक्के, तर विजय कुमार यांचा २२.९८ टक्के हिस्सा आहे. या कंपनीत आंध्र प्रदेश इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे १,२६,००० शेअर्स म्हणजेच १.४० टक्के शेअर्स आहेत.
कंपनीबद्दल माहिती
श्री चक्र सिमेंट लिमिटेड आंध्र प्रदेशातील अग्रगण्य औद्योगिक समूहाचा भाग आहे. पार्थसारथी सिमेंट्स अँड इंडस्ट्रीज लिमिटेड या नावानं श्री चक्र सिमेंटनं १९८५ मध्ये बाजारात प्रवेश केला. नंतर हे नाव बदलून श्री पार्थसारथी सिमेंट्स अँड इंडस्ट्रीज लिमिटेड आणि त्यानंतर गोल्डस्टार सिमेंट्स लिमिटेड असं करण्यात आलं. त्यानंतर पुन्हा नाव बदलून श्री चक्र सिमेंट्स लिमिटेड आणि नंतर श्री चक्र सिमेंट्स लिमिटेड असं करण्यात आलं.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)