stock market : भारतीय शेअर बाजाराती गुंतवणूकदारांचे हळूहळू मनोबल खचत चालले आहे. ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झालेली घसरण अद्यापही सुरुच आहे. शेअर बाजार उघडल्यानंतर अवघ्या ३ मिनिटांत सेन्सेक्स ४५० हून अधिक अंकांनी घसरला. परिणामी बाजार ९ महिन्यांतील सर्वात वाईट पातळीवर पोहोचला. या घसरणीमागे प्रमुख कारण ट्रम्प टॅरिफ आणि युक्रेन-रशिया यांच्यात संघर्षामुळे निर्माण झालेला भूराजकीय तणाव आहे. तज्ज्ञांच्या मते शेअर बाजारातील घसरण मार्च महिन्यातही कायम राहू शकते. यात कोणत्या स्टॉक्स कोसळले? गुंतवणूकदारांचे किती नुकसान झाले? याचा आम्ही आढावा घेतला आहे.
शेअर बाजार ९ महिन्यातील नीचांकी पातळीवर
जर आपण शेअर बाजाराच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, बाजार उघडल्यानंतर काही मिनिटांतच सेन्सेक्स आणि निफ्टी ९ महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचले. जून २०२४ नंतर सेन्सेक्स ७२ हजार अंकांपेक्षा कमी झाला. ५ जून २०२४ रोजी सेन्सेक्स ट्रेडिंग सत्रात ७१ अंकांच्या पातळीवर शेवटचा दिसला होता. दुसरीकडे, निफ्टीही ५ जूननंतर प्रथमच २२ अंकांच्या खाली घसरल्यानंतर २१ हजार अंकांच्या पातळीवर दिसून आला. तज्ज्ञांच्या मते, मार्च महिन्यात शेअर बाजारात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. ट्रम्प याचं आयात शुल्क धोरण आणि भू-राजकीय तणावाचा परिणाम संपूर्ण मार्च महिन्यात दिसून येईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
दिग्गज शेअर्समध्येही घसरण
या घसरणीमध्ये मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्याचा आधीच बाजार उठला आहे. पण, रिलायन्स, टीसीएस सारख्या दिग्गज शेअर्सलाही यात मार खावा लागला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमधील शेअर्सच्या घसरणीबद्दल बोलायचे झाले तर नेस्ले इंडिया आणि बजाज ऑटोच्या शेअर्समध्ये २.५० टक्क्यांहून अधिक घसरण दिसून येत आहे. तर एचसीएल टेक आणि इन्फोसिसचे शेअर दीड टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहेत. टायटनचे शेअर्स १.३६ टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करताना दिसले.
जर आपण तेजीच्या समभागांबद्दल बोललो तर NSE वर SBI आणि BEL च्या शेअर्समध्ये सुमारे ३ टक्क्यांची वाढ दिसून येत आहे. इंडसइंड आणि पॉवर ग्रिडच्या शेअर्समध्ये १ टक्क्यांहून अधिक वाढ दिसून येत आहे. दुसरीकडे, अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स सुमारे १ टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहेत.
गुंतवणूकदारांचे १.३३ लाख कोटी बुडाले
विशेष म्हणजे शेअर बाजारातील घसरणीमुळे आजही गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे. अवघ्या ३ मिनिटांत गुंतवणूकदारांच्या खिशातून १.३३ लाख कोटी रुपये बुडाले. सोमवारी शेअर बाजार बंद झाला तेव्हा बीएसईचे मार्केट कॅप ३,८०,२१,१९१.०८ कोटी रुपये होते, जे मंगळवारी शेअर बाजार उघडल्यानंतर तीन मिनिटांत ३,७८,८७,९१४.३३ कोटी रुपयांवर आले. याचा अर्थ बीएसईच्या मार्केट कॅपला १,३३,२७६.७५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.