Join us

शेअर बाजारात सलग दुसऱ्या घसरणीसह सुरुवात; Nifty च्या 'या' स्टॉक्समध्ये जोरदार विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2024 9:51 AM

Stock Market Opening : शेअर बाजारातील व्यवहार मंगळवारी पुन्हा एकदा घसरणीसह सुरू झाला आणि निफ्टी ७९ अंकांच्या घसरणीसह २३९१७ वर उघडला, तर सेन्सेक्स २४० अंकांनी घसरून ७८५४२ च्या पातळीवर आला.

Stock Market Opening : शेअर बाजारातील व्यवहार मंगळवारी पुन्हा एकदा घसरणीसह सुरू झाला आणि निफ्टी ७९ अंकांच्या घसरणीसह २३९१७ वर उघडला, तर सेन्सेक्स २४० अंकांनी घसरून ७८५४२ च्या पातळीवर आला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल आणि फेडच्या बैठकीसारख्या मोठ्या जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजार कमकुवत आहेत, तसंच एफआयआयची विक्री आणि उच्च मूल्यांकनाचा मुद्दा हीदेखील कारणं आहेत.

निफ्टी ५० पॅकमधून सुरुवातीच्या व्यवहारात हिंडाल्को, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, सन फार्मा आणि एचसीएल टेक या सारख्या काउंटर्समध्ये चांगली खरेदी झाली. त्याचप्रमाणे कोल इंडिया, अदानी पोर्ट्स, बीईएल, एचडीएफसी बँक आणि आयटीसी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री दिसून आली. सोमवारी बाजारात मोठी घसरण झाली आणि निफ्टीनं २४००० ची लेव्हल तोडली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालाबाबत साशंकता असल्यानं, जागतिक धोरणात मोठे बदल होण्याची शक्यता असल्यानं आठवड्याच्या पहिल्याच दिवशी निफ्टीमध्ये मोठी विक्री झाली.

काय म्हणाले एक्सपर्ट?

"अनेक जागतिक घडामोडी, एफआयआयची सातत्यानं होणारी विक्री आणि आतापर्यंत देशांतर्गत कंपन्यांचे कमकुवत निकाल यामुळे बाजार मंदीत राहण्याची अपेक्षा आहे. निर्देशांकातील अनेक आघाडीच्या कंपन्यांचे निकाल जाहीर होणार असल्यानं आणि बाजारात शेअर स्पेसिफिक अॅक्शन होण्याची शक्यता असल्यानं हा आठवडा महत्त्वाचा ठरणार आहे," अशी प्रतिक्रिया मोतीलाल ओस्वालचे रिसर्च आणि वेल्थ मॅनेजमेंट हेड सिद्धार्थ खेमका यांनी दिली.

अमेरिकन शेअर बाजारात घसरण

अस्थिर सत्रानंतर सोमवारी अमेरिकन शेअर बाजार किरकोळ घसरणीसह बंद झाला. गुंतवणूकदार या आठवड्यात मेगा इव्हेंट्सची वाट पाहत आहेत, ज्यामध्ये अमेरिकेच्या नव्या अध्यक्षांची निवड आणि फेडरल रिझर्व्हच्या धोरणाचा समावेश आहे.

टॅग्स :शेअर बाजार