Join us  

Share Market Aug 24 : शेअर बाजाराचा ऑगस्टला उच्चांकी पातळीवरून निरोप; Sensex-Nifty मध्ये तेजी; फार्मा शेअर्समध्ये खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 4:12 PM

Share Market Aug 24 : ऑगस्टच्या अखेरच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजार आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला. बँकिंग, फार्मा आणि हेल्थकेअर शेअर्समधील खरेदीमुळे बाजारात जोरदार तेजी दिसून आली.

ऑगस्टच्या अखेरच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजार आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला. बँकिंग, फार्मा आणि हेल्थकेअर शेअर्समधील खरेदीमुळे बाजारात जोरदार तेजी दिसून आली. या शानदार तेजीनंतर बीएसईवर लिस्टेड शेअर्सचं मार्केट कॅपही ४६४.४० लाख कोटी रुपयांच्या उच्चांकी पातळीवर बंद झालं. आजच्या व्यवहाराअखेर बीएसई सेन्सेक्स २३१ अंकांनी वधारून ८२,३६६ वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८४ अंकांनी वधारून २५,२३६ अंकांवर बंद झाला.

या शेअर्समध्ये तेजी / घसरण

आजच्या व्यवहारात सेन्सेक्सच्या ३० पैकी २३ समभाग वधारले आणि ७ घसरले. तर निफ्टीचे ५० पैकी ३७ शेअर्स वधारले आणि १३ घसरले. बजाज फायनान्स २.०२ टक्के, एनपीटीसी १.९१ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा १.९१ टक्के, एनटीपीसी १.८८ टक्के, बजाज फिनसर्व्ह १.४६ टक्के, सन फार्मा १.३५ टक्के आणि भारती एअरटेल १.३० टक्क्यांनी वधारले. तर टाटा मोटर्स ०.९२ टक्के, रिलायन्स ०.६९ टक्के, आयटीसी ०.६१ टक्के, टेक महिंद्रा ०.५१ टक्के, एचडीएफसी बँक ०.३४ टक्के, नेस्ले ०.२८ टक्के, मारुती ०.२४ टक्के, एचसीएल टेक ०.१७ टक्के, टाटा स्टील ०.१३ टक्क्यांनी घसरण झाली. 

मार्केट कॅप विक्रमी पातळीवर

शेअर बाजारातील विक्रमी तेजीमुळे मार्केट कॅपही उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. बीएसईमध्ये लिस्टेड शेअर्सचं मार्केट कॅप ४६२.५६ लाख कोटी रुपयांवरून ४६४.४१ लाख कोटी रुपयांवर पोहोचलं. म्हणजेच आजच्या सत्रात मार्केट कॅपमध्ये १.८५ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आज बाजारात सर्वात मोठी तेजी फार्मा, हेल्थकेअर शेअर्समध्ये होती. याशिवाय ऑटो, आयटी, मेटल्स, रिअल इस्टेट, एनर्जी, इन्फ्रा, ऑइल अँड गॅस आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स सेक्टरच्या शेअर्समध्येही खरेदी दिसून आली. केवळ एफएमसीजी आणि मीडिया शेअर्समध्ये घसरण दिसून आली. निफ्टीचा मिडकॅप निर्देशांकही आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला, तर निफ्टीचा स्मॉलकॅप निर्देशांकही वधारला.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक