भारतीय शेअर बाजारातील बिग बुल म्हटले जाणारे राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचे आज निधन झाले. त्यांचा जन्म 5 जुलै 1960 रोजी मुंबईत झाला. एका सामान्य कुटुंबात जन्मलेले दिग्गज गुंतवणूकदारराकेश झुनझुनवाला यांना व्यावसायिक जगतात बिग बुल म्हणूनही ओळखले जात होते. अलीकडेच त्यांनी आकासा एअरलाईन सुरू करून स्वस्त विमान सेवा पुरवण्याचे आश्वासन दिले होते.
भारताचे वॉरेन बफे म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांनी आपल्या मागे मोठे व्यावसायिक साम्राज्य सोडले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी रेखा झुनझुनवाला, मुलगी निष्ठा झुनझुनवाला (Nishtha Jhunjhunwala), मुलगा आर्यमान झुनझुनवाला (Aryaman Jhunjhulwala), मुलगी आर्यवीर झुनझुनवाला (Aryavir Jhunjhunwala) असा परिवार आहे. राकेश झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती सुमारे ४० हजार कोटी आहे. आकासा एअरमध्ये सर्वात मोठी भागीदारी त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे आहे. दोघांचा एकूण वाटा ४५.९७ टक्के आहे.
५ हजारांपासून सुरूवात
अवघ्या ५००० ते ४०००० कोटी रुपयांचे साम्राज्य निर्माण करणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांचे रविवारी वयाच्या ६२ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. तब्येतीच्या समस्येमुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांनी सकाळी ६.४५ वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण व्यापारी जगतात शोककळा पसरली आहे.
या कंपन्यांमध्ये गुंतवणूक
झुनझुनवाला हे रेअर एंटरप्रायझेस नावाची कंपनी चालवायचे. त्यांनी आपल्या फर्मच्या माध्यमातून अनेक कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. यामध्ये टायटन, टाटा मोटर्स, क्रिसिल, अरबिंदो फार्मा, प्राज इंडस्ट्रीज, एनसीसी, अॅपटेक लिमिटेड, आयन एक्सचेंज, एमसीएक्स, फोर्टिस हेल्थकेअर, ल्युपिन, व्हीआयपी इंडस्ट्रीज, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस, रॅलिस इंडिया, ज्युबिलंट लाइफ सायन्सेस या कंपन्यांचा समावेश आहे.