Join us

Stock Market : शेअर बाजारात तेजी, हा आठवडाही करणार का श्रीमंत?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2023 10:41 AM

जगभरात वाढत असलेली महागाई  आणि त्यावर काबू मिळविण्यासाठी बँकांनी उपसलेले व्याज दरवाढीचे हत्यार याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांच्या अस्थिरतेमध्ये दिसून येत आहे.

जगभरात वाढत असलेली महागाई  आणि त्यावर काबू मिळविण्यासाठी बँकांनी उपसलेले व्याज दरवाढीचे हत्यार याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांच्या अस्थिरतेमध्ये दिसून येत आहे. आगामी सप्ताहातही अशीच स्थिती कायम राहण्याचे संकेत आहेत. भारतातील औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी जरी या सप्ताहात जाहीर होणार असली, तरी त्याचे पडसाद मात्र पुढील सप्ताहात बघायला मिळणार आहेत.

गतसप्ताहामध्ये बहुतांश काळ बाजारावर विक्रीचे दडपण असल्याने बाजार खालीच आला. मात्र, सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी उसळी घेत सर्व तोटा भरून काढला. गतसप्ताहामध्ये बाजाराचे जवळपास सर्वच निर्देशांक वाढलेले दिसून आले. सेन्सेक्समध्ये ३४५.०४ अंशांची वाढ होऊन तो ५९,८००च्या पुढे गेला. निफ्टीही १७,६०० अंशांच्या जवळ पोहोचला आहे. मिडकॅप तसेच स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही वाढ झाली आहे.

परकीय वित्तसंस्थांकडून विक्रीचा मारागेल्या दोन महिन्यांपासून भारतामधून गुंतवणूक काढून घेणाऱ्या परकीय वित्तसंस्थांनी गतसप्ताहातही विक्रीच केलेली दिसून आली. या संस्थांनी गतसप्ताहामध्ये ६०१०.४४ कोटी रुपयांचे समभाग विकले. त्याचवेळी देशांतर्गत वित्तसंस्थांनी मात्र खरेदी केली आहे. 

परकीय वित्तसंस्थांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये ११,०९०.६४ कोटी रुपयांची विक्री केली असून, जानेवारी महिन्यात त्यांनी ४१,४६४.७३ कोटी रुपये भारतीय बाजारातून काढून घेतलेले आहेत. देशांतर्गत वित्तसंस्थांनी फेब्रुवारी महिन्यात बाजारात १९,२३९.२८ कोटी रुपये गुंतविले आहेत.

या सप्ताहात मंगळवारी धूलिवंदनामुळे बाजाराला सुट्टी असेल. जपानकडून होणारी व्याजदरांची घोषणा आणि अमेरिकेतील बेरोजगारीची आकडेवारी बाजारावर परिणाम करू शकते. परकीय वित्तसंस्थांची कामगिरीही बाजाराची दिशा ठरविण्यास हातभार लावू शकते.

गुंतवणूकदार ३ लाख कोटींनी श्रीमंतबाजाराने गतसप्ताहामध्ये दिलेल्या वाढीमुळे गुंतवणूकदारांची संपत्ती ३ लाख ४१ हजार ५५५.१२ कोटी रुपयांनी वाढली आहे. शेअर बाजारात नोंदणीकृत असलेल्या सर्व आस्थापनांचे एकत्रित बाजार भांडवलमूल्य सप्ताहाच्या अखेरीस २,६३,४२,२१८.११ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. 

शेअर बाजारातील पहिल्या १० कंपन्यांपैकी गतसप्ताहात ५ कंपन्यांचे भांडवल ८८,६०४.९९ कोटी रुपयांनी वाढले. स्टेट बँकेच्या भांडवलामध्ये सर्वाधिक वाढ झाली असून, त्यापाठोपाठ आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एचडीएफसी आणि भारती एअरटेल यांच्यात वाढ झाली. ज्या कंपन्यांचे भांडवल कमी झाले, त्यांच्यामध्ये इन्फोसिस, टीसीएस, रिलायन्स, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि आयटीसी या कंपन्या आहेत.

टॅग्स :शेअर बाजार