Share Market News : केंद्रात NDA सरकारची वापसी जवळपास निश्चित झाली आहे. त्यामुळे शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशीही शेअर बाजारात (Stock Market) वादळी वाढ झाली. 30 शेअर्सच्या बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) सेन्सेक्सने नवा सार्वकालिक उच्चांक गाठला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी (NIFTI) देखील रॉकेटच्या वेगाने वर गेला. दिवसाच्या शेवटी सेन्सेक्स 1618 अंकांच्या वाढीसह 76,693 च्या पातळीवर बंद झाला, तर निफ्टी 468 अंकांच्या वाढीसह 23,290 च्या पातळीवर बंद झाला.
लोकसभा निकालांनंतर वाढ
एक्झिट पोलच्या अंदाजानुसार निकाल न लागल्याने आधी बाजाराची घसरण झाली, मात्र एनडीए सरकार बहुमत मिळवून पुन्हा सत्तेत येण्याच्या तयारीत असल्याने दुसऱ्याच दिवशी शेअर बाजाराने जोरदार मुसंडी मारली. बुधवारपासून आज सलग तिसऱ्या दिवशी बाजार वधारला. आजदेखील एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाला सर्वांनी पाठिंबा दिल्यामुळे सेन्सेक्सने नवा विक्रम केला.
मार्केट कॅप 7.51 लाख कोटींनी वाढले
आजच्या सत्रात भारतीय शेअर बाजारातील जोरदार उसळीमुळे सलग तिसऱ्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 423.40 लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे मागील सत्रात 415.89 लाख कोटी रुपयांवर होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 7.51 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.
वाढणारे आणि घसरणारे शेअर्स
आजच्या सत्रात सर्वच क्षेत्रातील शेअर्स हिरव्या रंगावर बंद झाले. आयटी बँकिंग, ऑटो, एफएमसीजी, कंझ्युमर ड्युरेबल्स, फार्मा, धातू, ऊर्जा, आरोग्यसेवा, तेल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्स वाढीसह बंद झाले. यात महिंद्रा अँड महिंद्रा 5.83 टक्के, विप्रो 5.09 टक्के, टेक महिंद्रा 4.50 टक्के, इन्फोसिस 4.13 टक्के, टाटा स्टील 4.04 टक्के वाढीसह बंद झाले. तर, मेट्रोपोलिस 1.30 टक्के, ग्लेनमार्क 1.30 टक्के, एसबीआय लाइफ इन्शुरन्स 1.18 टक्के, पेज इंडस्ट्रीज 1.14 टक्के घसरणीसह बंद झाले.
सेन्सेक्सने 3 जूनचा विक्रम मोडला
विशेष बाब म्हणजे एक्झिट पोलच्या दुसऱ्या दिवशी किंवा गेल्या सोमवारी शेअर बाजारातील वाढीदरम्यान बीएसई सेन्सेक्सने आपला विक्रम मोडला होता. एक्झिट पोलमुळे बीएसई सेन्सेक्स 76,738.9 या उच्चांकावर पोहोचला होता. तर, शुक्रवारी सेन्सेक्सने तो विक्रम मोडी काढून 76,795 ची पातळी गाठली.
(टीप- शेअर बाजारात कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)