शुक्रवारी सलग 11व्या दिवशी शेअर बाजार तेजीसह बंद झाला. 16 वर्षांनंतर पहिल्यांदाच शेअर बाजारात 11 ट्रेडिंग दिवसात सातत्यानं वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. विशेष बाब म्हणजे या काळात गुंतवणूकदारांनी सुमारे 14 लाख कोटी रुपये कमावले आहेत. तसंच सेन्सेक्समध्ये साडेचार टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये जवळपास 5 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. शुक्रवारबद्दल सांगायचं झालं तर सेन्सेक्स आणि निफ्टी रेकॉर्ड स्तरावर बंद झालं. दोन्ही एक्सचेंजेसनं लाइफ टाइम हायचा नवा विक्रमही रचला. सेन्सेक्स 319 अंकांपेक्षा अधिक वाढला. तर निफ्टी 89 अंकांच्या वाढीसह बंद झाला.
16 वर्षांनंतर रेकॉर्ड
शुक्रवारी शेअर बाजार सलग 11व्या व्यवहारी दिवशी तेजीसह बंद झाला. तब्बल 16 वर्षांनंतर हा विक्रम बनला. यापूर्वी 2007 नंतर एवढी मोठी रॅली पाहायला मिळाली होती. जर आपण आकडेवारी पाहिली तर सेन्सेक्स 319 अंकांनी किंवा 0.47 टक्क्यांनी वाढला आणि 67,839 वर बंद झाला. कामकाजादरम्यान सेन्सेक्सनं 67927.23 हा नवा विक्रमी उच्चांक गाठला. सप्टेंबर महिन्यात सेन्सेक्स 4.62 टक्क्यांनी वाढला आहे.
दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक निफ्टी शुक्रवारी 89 अंकांनी किंवा 0.44 टक्क्यांनी वाढून 20,192 वर बंद झाला. ट्रेडिंग सत्रादरम्यान, निफ्टीनं देखील 20,222.45 अंकांची विक्रमी पातळी गाठली. दरम्यान, सप्टेंबर महिन्यात निफ्टी 4.85 टक्क्यांनी वाढला.
गुंतवणूकदारांनी कमावले 14 लाख कोटी
बाजारातील गुंतवणूकदारांसाठी सप्टेंबर महिना अतिशय चांगला ठरला आहे. ट्रेडिंगच्या 11 दिवसांत गुंतवणूकदारांनी 14 लाख कोटी रुपयांचा नफा कमावला. 31 ऑगस्ट रोजी बाजार बंद झाला तेव्हा बीएसईचे मार्केट कॅप 309.6 लाख कोटी रुपये होते, जे सध्या वाढून 323.4 लाख कोटी रुपये झाले आहे. जर शुक्रवारबाबत सांगायचं झालं तर गुंतवणूकदारांना 1.25 लाख कोटी रुपयांचा नफा झालाय.