Join us  

अखेरच्या तासात शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांनी कमावले ₹१.३९ लाख कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 4:38 PM

शेवटच्या तासात झालेल्या प्रचंड खरेदीमुळे आज 10 जानेवारी रोजी भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाले.

शेवटच्या तासात झालेल्या प्रचंड खरेदीमुळे आज 10 जानेवारी रोजी भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाले. सेन्सेक्सनं 271 अंकांची उसळी घेतली. तर निफ्टी 21,600 च्या पुढे वाढून बंद झाला. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज सुमारे 1.39 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.23 टक्क्यांनी व स्मॉलकॅप निर्देशांक 0.35 टक्क्यांनी वाढून बंद झाला. आजच्या व्यवहारात सर्वात जास्त वाढ आयटी, फार्मा आणि मेटल शेअर्समध्ये दिसून आली. दुसरीकडे, ऑईल अँड गॅस निर्देशांक जवळपास अर्ध्या टक्क्यांनी घसरून बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी, बीएसई सेन्सेक्स 271.50 अंकांनी किंवा 0.38% ने वाढून 71,657.71 वर बंद झाला. तर एनएसईचा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 78.95 अंकांच्या किंवा 0.37 टक्क्यांच्या वाढीसह 21,623.80 वर बंद झाला.

गुंतवणूकदारांनी कमावले ₹1.39 लाख कोटी

बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 10 जानेवारी रोजी वाढून 368.86 लाख कोटी रुपये झाले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे 9 जानेवारी रोजी 367.47 लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे, बीएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1.39 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.39 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

बीएसई सेन्सेक्समधील 30 पैकी 14 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्येही रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (RIL) शेअर्समध्ये सर्वाधिक 2.83% वाढ झाली आहे. यानंतर एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स आणि विप्रोचे शेअर्स सर्वाधिक 1.05% ते 2.22% पर्यंत वाढले.

या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण

तर उर्वरित 16 शेअर्स घसरणीसह बंद झाले. यामध्येही एनटीपीसीचे शेअर्स 1.97 टक्क्यांनी सर्वाधिक घसरले. तर पॉवर ग्रिड, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स आणि इन्फोसिसचे शेअर्स 0.63% ते 1.55% च्या घसरणीसह बंद झाले.

टॅग्स :शेअर बाजार