Share Market up Updates : अनेक दिवसांच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली. कामकाजादरम्यान सेन्सेक्समध्ये २०१६ अंकांची वाढ झाली असून ७९,१५० च्या वर गेला. तर दुसरीकडे निफ्टीमध्येही ५८९ अंकांची मोठी तेजी आली असून तो २३,९५० वर पोहोचला.
कामकाजादरम्यान, मिड कॅप, स्मॉल कॅपपासून लार्ज कॅप शेअर्सपर्यंत सर्वात तेजी दिसून आली. सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचं झालं तर बँक निफ्टी १.३१ टक्के, ऑटो १.०५ टक्के, फायनान्शियल सर्व्हिसेस १.२७ टक्क्यांनी वधारले आहेत. एफएमसीजी निर्देशांक १.२९ टक्के, आयटी १.९० टक्के, धातू १.३८ टक्के, फार्मा ०.८२ टक्के, पीएसयू बँक २.८७ टक्के, खासगी बँक ०.८० आणि रियल्टी निर्देशांक २.७६ टक्क्यांनी वधारले. ऑईल अँड गॅस, कन्झ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर मध्येही तेजी दिसून आली. कामकाजादरम्यान केवळ मीडिया इंडेक्स रेड झोनमध्ये होता. यादरम्यान रिलायन्सच्या शेअरमध्ये ३.४३ टक्क्यांची तेजी दिसून आली.
अदानींच्या शेअर्सचा जोरदार कमबॅक
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये गुरुवारी मोठी घसरण नोंदवण्यात आली. अमेरिकेत गौतम अदानी यांच्यावरील आरोपांनंतर समूहाचे शेअर्स २० टक्क्यांनी घसरले. पण आता अदानी समूहाच्या शेअर्सनं जोरदार पुनरागमन केलंय. समूहातील अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी दिसून येतेय. अदानी एनर्जीचा शेअर वगळता समूहाच्या सर्वच कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे.