Stock Market : ऑक्टोबर महिन्यापासून शेअर बाजारात सुरू असलेली पडझड आजच्या दिवशीही सुरुच राहिली. इन्फोसिस, टीसीएस आणि विप्रो सारख्या आयटी शेअर्समध्ये जोरदार घसरण झाल्यामुळे आठवड्याच्या पहिल्या व्यापार सत्रात भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. आयटी व्यतिरिक्त बहुतांश क्षेत्रांमध्ये वाढ झाली असली तरी आयटी शेअर्सच्या विक्रीमुळे बाजारावर दबाव आला. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स २४१ अंकांच्या घसरणीसह ७७,३७१ अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७९ अंकांच्या घसरणीसह २३,४६५ अंकांवर बंद झाला.
या शेअर्समध्ये चढउतार
आजच्या व्यवहारात सेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी १४ शेअर्स वाढीसह बंद झाले तर १६ शेअर्स तोट्यासह बंद झाले. निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी २१ शेअर्स वाढीसह आणि २९ तोट्यासह बंद झाले. वाढत्या शेअर्समध्ये टाटा स्टील, नेस्ले इंडिया, एचयूएल, एसबीआय, जेएसडब्ल्यू स्टील, अदानी पोर्ट्स, महिंद्रा अँड महिंद्रा, कोटक महिंद्रा बँक, मारुती सुझुकी, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स आणि एशियन पेंट्स यांचा समावेश आहे. तर टीसीएस, इन्फोसिस, टेक महिंद्रा, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक आणि अॅक्सिस बँक घसरणीसह बंद झाले.
कोणत्या सेक्टरमध्ये काय परिस्थिती?
आजच्या व्यवहारात बँकिंग, ऑटो, एफएमसीजी, मेटल्स, रिअल इस्टेट, कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ झाली, तर आयटी, हेल्थकेअर, ऑइल अँड गॅस, एनर्जी, मीडिया आणि फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्री दिसून आली. आजच्या व्यवहारादरम्यान, निफ्टी मिडकॅप निर्देशांक सपाट बंद झाला तर निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक घसरणीसह बंद झाला.
भारतीय शेअर बाजारात का होतेय घसरण?
भारतीय शेअर बाजाराच्या घसरणीत आयटी समभागांचा मोठा वाटा आहे. निफ्टीचा आयटी निर्देशांक एका वेळी १२०० हून अधिक अंकांनी घसरला. हा निर्देशांक २.२२ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला आहे. इन्फोसिस, टीसीएस, टेक महिंद्रा, विप्रो आणि LTIMindtree आणि एचसीएल टेक समवेत निफ्टी IT निर्देशांकात समाविष्ट असलेले सर्व १० शेअर्स घसरुन बंद झाले. याला कारण ठरलंय यूएस फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांचे एक वक्तव्य. सेंट्रल बँकेने व्याजदर कमी करण्यासाठी घाई करण्याची गरज नाही, असं वक्तव्य पॉवेल यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे अमेरिकन टेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आणि त्याचा परिणाम भारतीय आयटी शेअर्सवरही झाला. वास्तविक भारतीय आयटी कंपन्यांच्या महसुलाचा मोठा हिस्सा अमेरिकेतून येतो.