Join us  

Stock Market Closing: शेअर बाजाराच्या घसरणीला ब्रेक, सेन्सेक्स ८७५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांनी कमावले ८.३३ लाख कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2024 4:15 PM

Stock Market Closing: भारतीय शेअर बाजारासाठी आजचा दिवस अतिशय चांगला होता आणि सेन्सेक्समध्ये सकाळपासून सुरू असलेली तेजी संध्याकाळी तेजीसहच थांबली.

Stock Market Closing: भारतीय शेअर बाजारासाठी आजचा दिवस अतिशय चांगला होता आणि सेन्सेक्समध्ये सकाळपासून सुरू असलेली तेजी संध्याकाळी तेजीसहच थांबली. सेन्सेक्स-निफ्टीमध्ये प्रचंड तेजी आल्याने गुंतवणूकदारांनी भरघोस कमाई केली आणि एका दिवसात साडेआठ लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेची भर पडली.

बीएसई सेन्सेक्स ८७४.९४ अंकांनी वधारून ७९,४६८ वर बंद झाला. याशिवाय राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३०४.९५ अंकांनी म्हणजेच १.२७ टक्क्यांच्या वाढीसह २४,२९७ वर बंद झाला.

३० पैकी २५ शेअर्समध्ये तेजी

सेन्सेक्सच्या ३० पैकी २५ शेअर्समध्ये आज जोरदार तेजी दिसून आली आणि केवळ ५ शेअर्समध्ये घसरण झाली. अदानी पोर्ट्स ३.४२ टक्क्यांनी वधारून बंद झाला आणि सेन्सेक्समध्ये तो सर्वाधिक वधारला. त्यानंतर पॉवरग्रिड ३.२० टक्क्यांनी वधारून बंद झाला. घसरलेल्या शेअर्समध्ये इंडसइंड बँक २.५४ टक्क्यांनी तर एचयूएल ०.३३ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. टेक महिंद्रा, टायटन आणि भारती एअरटेलही घसरणीसह रेड झोनमध्ये बंद झाले.

कामकाजाच्या अखेरिस बँक निफ्टी ३७०.७० अंकांच्या बंपर वाढीसह ५०,११९ वर बंद झाला. बँक निफ्टीचे १२ पैकी १० शेअर्स वधारले आणि इंडसइंड बँक, एयू स्मॉल फायनान्स बँक घसरले. सेन्सेक्समध्ये पंजाब नॅशनल बँकेचे शेअर्स सर्वाधिक दोन टक्क्यांनी वधारले, त्यापाठोपाठ एचडीएफसी बँक, बँक ऑफ बडोदा, बंधन बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्येही वाढ झाली.

गुंतवणूकदारांची मोठी कमाई

आज बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप ४४८.६२ लाख कोटी रुपयांवर आलं. मंगळवारी बीएसईचं मार्केट कॅप ४४०.२७ लाख कोटी रुपये होतं. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज ८.३३ लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

टॅग्स :शेअर बाजार