Join us

शेअर बाजारात हाहाकार! 'या' ५ मोठ्या कारणांमुळे बाजार कोसळला, घसरण वाढणार की थांबणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 16:47 IST

stock market crashed : कोरोनानंतर भारतीय शेअर बाजारात सर्वात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. वास्तविक, बाजार बंद होताना सावरला असला तरी तो लाल रंगातच बंद झाला.

stock market crashed : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेने जगभरातील बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली आहे. देशांतर्गत शेअर बाजारात ऐतिहासिक घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स ३००० अंकांनी घसरला तर निफ्टीने १२०० अंकांनी खाली आला. मात्र, बंद होताना बाजार खालच्या पातळीवरून सावरला. टॅरिफ युद्ध आणि जागतिक मंदीच्या चिंतेमुळे आज बाजारात सर्वांगीण घसरण झाली. रिलायन्स, टाटा मोटर्स, टाटा स्टील, इन्फोसिस, एचसीएल टेक सारख्या समभागात १०% पर्यंत घसरण झाली आहे. या धक्क्याने गुंतवणूकदारांचे १९ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

कोविडनंतर बाजारात सर्वात मोठी घसरण होण्यास फक्त टॅरिफ कारणीभूत नाही. ही घसरण कधी थांबणार? तुम्ही गुंतवणूकदार असाल तर तुम्ही या प्रश्नांची उत्तरे शोधत असाल. बाजार घसरण्याची ५ मुख्य कारणे कोणती ती जाणून घेऊया. 

जागतिक विक्रीट्रम्प यांच्या टॅरिफ दहशतीमुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये विक्रीचा दबाव निर्माण झाला. ट्रम्प प्रशासन टॅरिफ निर्णय मागे घेण्याच्या मूडमध्ये दिसत नाही. त्याचा परिणाम आज भारतीय बाजारावरही झाला आहे.

बाजारात मंदीची चिंता वाढलीट्रम्प प्रशासनाने १८० हून अधिक देशांवर टॅरिफ लादला आहे. यामुळे बाजारातील अस्थिरता आणि चिंता वाढली आहे. चर्चेतून यावर लगेच तोडगा निघेल अशी आशा धुळीस मिळाली आहे. त्यामुळे अमेरिकेसह जगभरातील देशांमध्ये मंदीचा धोका वाढला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारतीय बाजारात आणखी घसरण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

महागाई वाढण्याचा धोकाट्रम्प यांच्या टॅरिफमुळे जगभरात महागाई वाढेल, ज्यामुळे कॉर्पोरेटचा नफा कमी होईल, असे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे कंपन्यांचे उत्पन्न कमी होईल. इतकेच नाही तर त्यांचा ग्राहकांच्या भावनेवर नकारात्मक परिणाम होईल आणि आर्थिक वाढीवर भार पडेल, अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे.

विदेशी गुंतवणूकदारांची पुन्हा विक्रीगेल्या महिन्यात परकीय गुंतवणूकदारांनी विक्री बंद करुन खरेदी सुरू केली होती. मात्र, टॅरिफनंतर परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) पुन्हा एकदा एप्रिलमध्ये भारतीय शेअर्सची विक्री करण्यास सुरुवात केली आहे. या महिन्यापर्यंत (शुक्रवारपर्यंत), एफपीओने रोख विभागामध्ये १३,७३० कोटी किमतीचे भारतीय शेअर विकले आहेत. यामुळे बाजारातील घसरणही वाढली आहे.

आरबीआयची बैठकआरबीआय एमपीसीची ३ दिवसीय बैठक ७ एप्रिलपासून सुरू झाली आहे. गुंतवणूकदारांना आशा आहे की वाढत्या जागतिक जोखमीच्या पार्श्वभूमीवर आरबीआय धोरणात्मक व्याजदरात कपात करेल.

वाचा - 'या' ३ देशांमध्ये राहतात जगातील ५० टक्के श्रीमंत लोक! भारताचं नाव यादीत आहे की नाही?

बाजार तज्ञ काय म्हणतात?शेअर बाजार तज्ज्ञांनी सांगितले की, बाजारातील स्थिती सुधारण्यास वेळ लागेल. कारण भारतीय बाजारांवर शुल्काचे ढग गडद आहेत. जर गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करायची असेल तर ही गुंतवणूक करण्याची योग्य वेळ आहे. ट्रम्प टॅरिफचा सर्वात मोठा परिणाम वाहन क्षेत्रावर दिसून येत आहे. भारतीय बाजार स्थिर होण्यासाठी दोन ते तीन महिने लागू शकतात. अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम सर्व क्षेत्रांवर दिसून येईल, असंही तज्ज्ञ म्हणाले. 

टॅग्स :डोनाल्ड ट्रम्पअमेरिकाशेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक