मंगळवारी शेअर बाजारातील कामकाजाची सुरुवात फ्लॅट टू पॉझिटिव्ह झाली. निफ्टी २९ अंकांच्या वाढीसह २४६२६ अकांवर उघडला, तर सेन्सेक्स ६७ अंकांच्या वाढीसह ८०७३१ वर उघडला. सुरुवातीच्या व्यवहारात कोल इंडिया, अदानी एंटरप्रायझेस, एचसीएल टेक, भारती एअरटेल, एसबीआय आणि टाटा स्टीलमध्ये खरेदी दिसून येत आहे, तर डॉक्टर रेड्डीज, एल अँड टी, डिव्हिस लॅब, सन फार्मा या शेअर्समध्ये सुरुवातीच्या व्यवहारात घसरण दिसून आली.
मेटल, रिअल इस्टेट आणि ऑटो सेक्टरमध्ये खरेदी दिसून येत आहे. देशांतर्गत बाजारांमध्ये आठवड्याची सुरुवात तेजीसह झाली होती, मागील आठवड्यातील तेजी कायम ठेवत निर्देशांकांनी सोमवारी आणखी एक नवा उच्चांक गाठला होता. निफ्टीसाठी २४६०० ची पातळी अत्यंत महत्त्वाची आहे. निफ्टी गेल्या तीन ट्रेडिंग सत्रांपासून या पातळीच्या आसपास आहे आणि या कालावधीत ओपन इंट्रेस्ट डाटा बिल्डअप झाला आहे.
मार्केट कॅप सव्वा लाख कोटींनी वाढलं
एकंदरीत बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप सव्वा लाख कोटी रुपयांनी वाढलं आहे, म्हणजेच बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सव्वा लाख कोटी रुपयांची वाढ झाली. आता इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांबद्दल बोलायचं झालं तर बीएसई सेन्सेक्स सध्या ८०,७९३.१२ वर आणि निफ्टी २४,६२३.५५ वर आहे. एका दिवसापूर्वी म्हणजे १५ जुलै २०२४ रोजी बीएसईवर लिस्टेड सर्व शेअर्सचं एकूण मार्केट कॅप ४,५५,०६,५६६.४८ कोटी रुपये होतं. आज १६ जुलै २०२४ रोजी बाजार उघडताच ते ४,५६,३१,८४०.६३ कोटी रुपयांवर पोहोचलं. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १,२५,२७४.१५ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.