Stock Market : दुःखानंतर सुख आणि संकटानंतर यश हे मिळतंच, फक्त संयम ठेवणे आवश्यक आहे. याची प्रचिती आज लाखो गुंतवणूकदारांना आली असेल. शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजारात जबरदस्त वाढ दिसून आली. बऱ्याच दिवसांनी बाजारात जोरदार उसळी पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हींनी प्रत्येकी ३ टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे. रियल्टी निर्देशांक ३ टक्क्यांनी वाढून बंद झाला. बँकिंग शेअर्समध्ये खरेदीमुळे निफ्टी बँकेला पाठिंबा मिळत होता. आयटी निर्देशांकातही वाढ झाली. दोन्ही निर्देशांक जवळपास ३ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. याशिवाय एफएमसीजी इंडेक्स, कंझ्युमर ड्युरेबल्स, पीएसयू बँक शेअर्समध्येही मोठी खरेदी झाली.
देशांतर्गत शेअर बाजार कोणत्या पातळीवर बंद झाला?
शुक्रवारच्या व्यवहारात, NSE चा निफ्टी ५५७.३५ अंकांच्या किंवा २.३९ टक्क्यांच्या उसळीसह २३,९०७ वर बंद होताना दिसला. BSE सेन्सेक्स १९६१.३२ अंकांच्या किंवा २.५४ टक्क्यांच्या मोठ्या वाढीसह ७९,११७ वर बंद झाला.
सेन्सेक्स शेअर्समध्ये हिरवाई
गेल्या दीड महिन्यात पहिल्यांदाच सेन्सेक्समधील ३० पैकी ३० शेअर्स हिरव्या रंगात व्यवहार करताना दिसले. सेन्सेक्समध्ये सर्वाधिक वाढ झालेल्यांमध्ये एसबीआय, टीसीएस, टायटन, आयटीसी, इन्फोसिस, एल अँड टी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून येत आहे.
निफ्टीतील शेअर्सची परिस्थिती काय?
निफ्टी ५० शेअर्सपैकी ४९ शेअर्स वधारताना दिसले. फक्त १ शेअर घसरणीसह व्यवहार करताना पाहायला मिळाला. केवळ बजाज ऑटोचा शेअर घसरणीच्या लाल चिन्हात होता. इतर सर्व शेअर्स वाढीसह व्यवहार करताना दिसत आहेत. एसबीआय, बजाज फायनान्स, आयटीसी, टीसीएस आणि टायटन या कंपन्यांची नावे सर्वात वर आहेत.
BSE चे मार्केट कॅप
जर आपण बीएसईच्या मार्केट कॅपवर नजर टाकली तर ती ४३२.७० लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. यासह आज ७.४१ लाख कोटी रुपयांची मोठी झेप नोंदवली गेली आहे. यामध्ये ४०४१ शेअर्सवर ट्रेडिंग बंद झाली आणि २४४६ शेअर्समध्ये वाढ झाली. १४७५ शेअर्समध्ये घसरण झाली असून १२० शेअर्सच्या घसरणीसह व्यवहार बंद झाला.