Stock Market Highlights: देशांतर्गत शेअर बाजारात जवळपास दीड महिन्यापासून विक्री आणि नफावसुलीचं सत्र सुरू आहे. शेअर बाजाराची सुरुवात बुधवारी घसरणीसह झाली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स १५० अंकांच्या आसपास, निफ्टी ८० अंकांच्या आसपास आणि बँक निफ्टी ८० अंकांच्या आसपास घसरला होता. निफ्टी २३,९०० च्या खाली दिसला.
मिडकॅप निर्देशांकही जवळपास ३०० अंकांनी घसरला. मात्र, त्यानंतर बँक निफ्टीमध्ये किंचित सुधारणा दिसून आली. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँकेच्या किरकोळ तेजीचा परिणाम निर्देशांकात दिसून आला. नफावसुलीमुळे डाऊदेखील ४०० अंकांनी घसरला.
मागील बंदच्या तुलनेत कामकाजाच्या सुरुवातीला सेन्सेक्स १८० अंकांनी घसरून ७८,४९५ वर खुला झाला. निफ्टी ६१ अंकांनी घसरून २३,८२२ वर तर बँक निफ्टी १२७ अंकांनी घसरून ५१,०३० वर खुला झाला. निफ्टीवर भारती एअरटेल, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, विप्रो, टायटन या कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले. तर बीईएल, हीरो मोटोकॉर्प, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती, टाटा स्टील यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले.
अमेरिकेच्या बाजारातही नफावसूली
सलग चार दिवस उच्चांक गाठल्यानंतर अमेरिकेच्या बाजारात नफावसुली झाली. त्यातच देशातील कालच्या महागाईचे आकडेही भीतीदायक आहेत. खाण्या-पिण्याच्या महागाईत झपाट्यानं वाढ झाल्यानं ऑक्टोबरमधील किरकोळ महागाई १४ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. सीपीआय साडेपाच टक्क्यांवरून साडेसहा टक्क्यांवर गेला आहे. सप्टेंबरमधील आयआयपी वाढही ६.४ टक्क्यांवरून ३.१ टक्क्यांवर आली आहे.