Join us  

शेअर बाजाराचा वारू झेपावला; ७ दिवसांत १८ लाख काेटींची कमाई, गुंतवणूकदार सुखावले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2023 6:29 AM

सेन्सेक्स झाला ६९ हजारी, निफ्टीनेही गाठला नवा उच्चांक

मुंबई : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर शेअर बाजारात माेठी तेजी आली आहे. शेअर बाजाराचे निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी नव्या उच्चांकावर पाेहाेचले आहेत. सेन्सेक्स ६९ हजारी झाला असून प्रथमच या पातळीच्या वर बंद झाला आहे. गेल्या ७ सत्रांमध्ये बाजारात सलग तेजी असून गुंतवणूकदार जवळपास १८ लाख काेटी रुपयांनी श्रीमंत झाले आहेत.

४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल रविवारी लागले. भाजपने तीन राज्यांमध्ये विजय मिळविल्यानंतर साेमवारी शेअर बाजाराचा वारू १,३०० अंकांनी उसळला हाेता. त्यानंतर मंगळवारीही बाजारात तेजी कायम राहिली. सेन्सेक्स ४३१ अंकांनी वधारून ६९,२९६ अंकांवर तर, निफ्टी १६८ अंकांनी वधारला आणि २०,८५५ अंकांवर बंद झाला. परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी साेमवारी २,०७३ काेटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. 

एवढी तेजी कशामुळे?शेअर बाजारातील जाणकारांच्या अंदाजानुसार, बाजारात काही दिवस तेजी राहू शकते. निवडणुकीच्या निकालांशिवाय अनेक घटक तेजीला कारणीभूत आहेत. त्यात प्रामुख्याने परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी माेठ्या प्रमाणात भारतात खरेदी केली आहे. चीनमध्ये घटलेले उत्पादन आणि निर्यातीमुळे या गुंतवणूकदारांनी भारताकडे लक्ष वळविले आहे. स्थिर व्याजदर, जीडीपीमधील वाढ इत्यादी प्रमुख घटकांमुळे गुंतवणूकदार आकर्षित हाेत आहेत.

महिनाभरात ६ हजारांची झेपसेन्सेक्समध्ये १ नाेव्हेंबरपासून तेजी दिसत आहे. या दिवशी सेन्सेक्स ६३,१४८ अंकांवर बंद झाला हाेता. तेव्हापासून ५ डिसेंबरपर्यंत सेन्सेक्सने तब्बल ६,१४८ अंकांची झेप घेतली आहे. निफ्टीही या कालावधीत १,९९८ अंकांनी वाढला आहे.

दाेन दिवसांत तीन लाख काेटींची श्रीमंतीसाेमवारी शेअर बाजारातील तेजीमुळे मुंबई शेअर बाजारातील नाेंदणीकृत कंपन्यांचे बाजार भांडवल २.४ लाख काेटी रुपयांनी वाढले. मंगळवारी त्यात सुमारे ६० हजार काेटी रुपयांची भर पडली. ३४६ लाख काेटी रुपये बीएसईतील कंपन्यांचे बाजार भांडवल झाले आहे.

अवघ्या १२ दिवसांत साडेतीन हजारांची तेजी

२० नाेव्हेंबरपासून शेअर बाजारत तेजी कायम आहे. या दिवशी सेन्सेक्स ६५,६५५ अंकांवर बंद झाला हाेता. तेव्हापासून १२ दिवसांत सेन्सेक्स ३,६४१ अंकांनी वधारला आहे. तर निफ्टीतही १,१६१ अंकांची वाढ झाली.

या क्षेत्रात तेजी राहणाररिअल इस्टेट, वाहन उद्याेग, वित्तीय संस्था तसेच ऊर्जा कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी कायम राहू शकते. आरबीआय यंदाही व्याजदर स्थिर ठेवू शकते, असा अंदाज आहे.

टॅग्स :शेअर बाजार