Stock Market News: देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात बुधवारी (११ डिसेंबर) फ्लॅट झाली. शेअर बाजाराचा निर्देशांक सातत्यानं रेड-ग्रीन झोनमध्ये जाताना दिसत होता. कामकाजाच्या सुरुवातीला सेन्सेक्स ६० अंकांनी वधारून ८१,५७२ वर, निफ्टी १३ अंकांनी वधारून २४,६२३ वर आणि बँक निफ्टी ११८ अंकांनी घसरून ५३,४५९ वर होता. तर निफ्टी मिडकॅप १०० मध्ये २८ अंकांची वाढ झाली आणि तो ५९,१६४ च्या पातळीवर होता.
मागील बंदच्या तुलनेत सेन्सेक्स ५८ अंकांनी वधारून ८१,५६८ वर उघडला. निफ्टी १० अंकांनी वधारून २४,६२० वर आणि बँक निफ्टी ११७ अंकांनी घसरून ५३,४५९ वर उघडला. निफ्टीवर अल्ट्राटेक सिमेंट, ग्रासिम, टाटा कन्झ्युमर, कोल इंडिया, नेस्ले इंडिया या शेअरमध्ये तेजी होती. डॉ रेड्डीज, आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक, ट्रेंट, अपोलो हॉस्पिटलमध्ये घसरण झाली.
दरम्यान, जागतिक बाजारातून संमिश्र संकेत मिळत आहेत. दोन दिवसांपासून बाजारात सुस्ती दिसून येत आहे. सलग दोन दिवस लाल चिन्हावर बंद झाल्यानंतर ते अगदी किरकोळ वाढीसह बंद झाले. अमेरिकेच्या बाजारात नफावसुली सुरूच आहे. नॅसडॅक सलग सातव्या दिवशी ५० अंकांनी घसरला, तर डाऊ सलग चौथ्या दिवशी १५० अंकांनी घसरून बंद झाला.
गिफ्ट निफ्टी २४,६७५ च्या जवळ फ्लॅट होता. आजच्या नोव्हेंबरच्या सीपीआयच्या आकडेवारीपूर्वी डाऊ फ्युचर्स मंदावले होते. आशियाई बाजारात प्रमुख निर्देशांक निक्केई ५० अंकांनी घसरला. तसं पाहिले तर काल एक चांगली गोष्ट म्हणजे कॅश मार्केटमध्ये एफआयआय आणि देशांतर्गत फंडांकडून खरेदी दिसून आली.