Stock Market Opening: सोमवारच्या जोरदार घसरणीनंतर आजही देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. मात्र कालच्या जोरदार घसरणीनंतर आज खरेदीच्या संधी परतण्याची पूर्ण चिन्हं दिसू लागल्यानं गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. बँक निफ्टी आज २०५ अंकांनी वधारला. बीएसईचा सेन्सेक्स आज ८४,२५७.१७ वर उघडला आणि तेजीसह सुरुवात केली. निफ्टीच्या ५० पैकी ३८ शेअर्समध्ये तेजी दिसून येत असून तो २५,७८८.४५ वर ट्रेड करताना दिसत आहे.
निफ्टीला त्याच्या मोठ्या सपोर्ट लेव्हल २५,८०० चा काहीसा आधार मिळताना दिसत आहे. निफ्टीसाठी २५,८०० ची पातळी तोडली तर त्यात आणखी घसरण होऊ शकते, ज्यामुळे तो २५५०० पर्यंत जाऊ शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. तर दुसरीकडे अपल लेव्हलकडे २६ हजारची लेव्हल आता मोठा रेझिस्टंस मानला जात आहे.
सुरुवातीच्या व्यवहारात टेक महिंद्रा, एल अँड टी, महिंद्रा अँड महिंद्रा, कोल इंडिया, एसबीआय या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे, तर एशियन पेंट्स, जेएसडब्ल्यू स्टील, हिंडाल्को, मारुती सुझुकी, एचयूएल यासारख्या शेअर्सवर विक्रीचा दबाव दिसून येत आहे.
मध्यपूर्वेतील वाढता भू-राजकीय तणाव आणि जपानी बाजारातील कमकुवतपणाच्या पार्श्वभूमीवर बँकिंग, फायनान्स आणि ऑटो कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार विक्री झाल्याने सोमवारी सेन्सेक्स आणि निफ्टी तब्बल १.५ टक्क्यांनी घसरले. "गेल्या काही आठवड्यात साइडवे मूव्ह पाहिल्यानंतर नजीकच्या काळात बाजार मजबूत होईल, अशी आमची अपेक्षा आहे. या आठवड्यापासून कंपन्यांनी तिमाहीपूर्व अपडेट्स जाहीर केल्यानं क्षेत्रनिहाय आयटी आणि बँकिंग क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले जाऊ शकते," अशी प्रतिक्रिया रेलिगेअर ब्रोकिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष (संशोधन) अजित मिश्रा यांनी दिली.
अमेरिकन बाजारात तेजी
एसअँडपी ५०० निर्देशांक सोमवारी विक्रमी उच्चांकी पातळीवर बंद झाला. फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेला व्याजदरात आणखी कपात करण्याची घाई नसल्याचं म्हटलंय. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (एफआयआय) सोमवारी भारतीय शेअर बाजारात ९,७९१ कोटी रुपयांची निव्वळ विक्री केली. तर डीआयआयने ६,६४६ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.