Stock Market Opening: जागतिक बाजारातील संकेतांचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावर दिसून येत आहे. शेअर बाजाराच्या सुरुवातीला बँक निफ्टीमध्ये घसरण दिसून येत असून ऑटो, पीएसयू बँक, एफएमसीजी यांसारख्या सेक्टोरल निर्देशांकांमध्येही घसरण दिसून आली. आयटी शेअर्समधील तेजीच्या जोरावर आयटी निर्देशांकात वाढ दिसून येत असून एफएमसीजी निर्देशांक घसरणीसह उघडला. परंतु ५ मिनिटांतच एफएमसीजी क्षेत्रात अर्ध्या टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली.
अनोखा ट्रेड सीनारियो
सकाळी बाजार उघडला तेव्हा बँक निफ्टीमध्ये घसरण दिसून आली होती, पण उघडल्यानंतर १५ मिनिटांनंतर त्यात पुन्हा तेजी दिसून आली. एफएमसीजी क्षेत्रात ब्रिटानियाच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली, तर दुसरीकडे आयटीसीनं आतापर्यंतची उच्चांकी पातळी गाठली. सकाळी ९.३० च्या सुमारास शेअर बाजारात सेन्सेक्स ८१,७७३.७८ आणि निफ्टी २४,९९५.६५ वर व्यवहार करत होता.
मंगळवारी कामकाजाच्या अखेरिस बीएसई सेन्सेक्स ३६१.७५ अंकांनी वधारून ८१,९२१.२९ वर बंद झाला. तर निफ्टी ५० १०४.७० अंकांनी म्हणजेच ०.४२ टक्क्यांनी वधारून २५,०४१.१० वर बंद झाला.
कच्च्या तेलाचे दर स्थिरावले
कच्च्या तेलाच्या किमती तीन वर्षांच्या नीचांकी पातळीवर घसरल्यानंतर आता स्थिरावल्या आहेत. ब्रेंट क्रूडचा वायदा भाव मंगळवारी तीन टक्क्यांहून अधिक घसरणीनंतर ०.५२ टक्क्यांनी वधारून ६९.५५ डॉलर प्रति बॅरल झाला. यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (डब्ल्यूआयटी) क्रूड ०.६१ टक्क्यांनी वाढून ६६.१५ डॉलर प्रति बॅरल झाले.