देशांतर्गत शेअर बाजारात मंगळवारी दमदार सुरुवात झाली. सेन्सेक्स २५० अंकांच्या तेजीसह व्यवहार करत होता. निफ्टी तब्बल ८० अंकांनी वधारला. बँक निफ्टीही १५० अंकांच्या वर व्यवहार करत होता. मिडकॅप निर्देशांकातही खरेदी दिसून आली. मागील बंदच्या तुलनेत सुरुवातीला सेन्सेक्स १४८ अंकांनी वधारून ७९,६४४ वर उघडला. तर दुसरीकडे निफ्टी ८४ अंकांनी वधारून २४,२२५ वर आणि बँक निफ्टी १७७ अंकांनी वधारून ५२,०५३ वर उघडला.
निफ्टीवर ट्रेंट, एचडीएफसी लाइफ, बीपीसीएल, आयसीआयसीआय बँक, हिंडाल्कोमध्ये चांगली वाढ दिसून आली. टाटा समूहाचा शेअर ट्रेंट अडीच टक्क्यांनी वधारला. ब्रिटानिया, एशियन पेंट, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती, नेस्ले इंडियामध्ये मात्र घसरण झाली.
बीएसई सेन्सेक्सवर भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, सन फार्मा, टाटा स्टील, रिलायन्स या शेअरमध्ये चांगली तेजी दिसून आली. एचडीएफसी बँक, मारुती, एशियन पेंट, एचयूएल, नेस्ले आणि टीसीएस मध्ये घसरण झाली.
कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण
काल सोन्या-चांदीत मोठी घसरण पाहायला मिळाली, कच्च्या तेलाची किंमतही अडीच टक्क्यांनी घसरून ७२ डॉलरच्या खाली आली. गेल्या अनेक दिवसांपासून त्यात प्रचंड चढ-उतार होत आहेत. डॉलर निर्देशांक ४ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर १०५.५० वर पोहोचला आहे, ज्यामुळे कमॉडिटीच्या किंमती कमकुवत होत आहेत. कच्च्या तेलाच्या घसरत्या किमतींमुळे या क्षेत्राला आधार मिळाला तर शेअर बाजारातील दबाव काहीसा कमी होऊ शकतो.
जागतिक बाजाराची स्थिती काय?
जागतिक बाजाराच्या अपडेटबद्दल बोलायचं झालं तर काल सलग चौथ्या दिवशी अमेरिकन बाजार नव्या उच्चांकी पातळीवर बंद झाले. सलग पाचव्या दिवशी डाऊ ३०० अंकांनी वधारून ४४,००० च्या वर बंद झाला, तर नॅसडॅक १२ अंकांनी वधारला. गिफ्ट निफ्टी आज सकाळी २४,२०० च्या आसपास फ्लॅट दिसत होता. डाऊ फ्युचर्स २५ अंकांनी तर निक्केई १५० अंकांनी वधारले.