Join us

शेअर बाजारात नफा वसूली, बँकिंग स्टॉक्स आपटले; एशियन पेंट्स, Sbi Life मध्ये तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 4:08 PM

निफ्टी आणि सेन्सेक्सची तेजीसह व्यवहाराला सुरुवात झाली आणि नवा उच्चांक गाठला. पण आजच्या सत्रात बाजार उच्च पातळीवरून नफावसुलीला बळी पडला.

शेअर बाजारात बुधवारी मोठ्या प्रमाणात नफा वसुली दिसून आली. निफ्टी आणि सेन्सेक्सची तेजीसह व्यवहाराला सुरुवात झाली आणि नवा उच्चांक गाठला. पण आजच्या सत्रात बाजार उच्च पातळीवरून नफावसुलीला बळी पडला. दिवसभरातील नीचांकी पातळीतून काहीशी सुधारणा झाली असली तरी दिवसअखेर बाजार रेड झोनवर बंद झाला. बाजारात आज बराच काळ तेजी राहिल्यानंतर काही प्रमाणात नफा वसुलीचे वातावरण होतं.

कामकाजाच्या अखेरिस निफ्टी १०९ अंकांच्या घसरणीनंतर २४३२४ च्या पातळीवर बंद झाला, तर सेन्सेक्स ४२७ अंकांच्या घसरणीनंतर ७९९२७ च्या पातळीवर बंद झाला. आजच्या कामकाजात फार्मा, एफएमसीजी, एनर्जी आणि रिअल इस्टेट ही प्रमुख क्षेत्रं होती. तर लार्ज कॅप प्रायव्हेट बँकिंग शेअर्स आणि पीएसयू बँकांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. आयटी क्षेत्रातही विक्री दिसून आली. मेटल आणि ऑटो निर्देशांकांमध्येही विक्रीचा दबाव दिसून आला.

एशियन पेंट्स, एसबीआय लाइफ, डिव्हिस लॅब, ब्रिटानिया आणि ग्रासिम इंडस्ट्रीज या कंपन्यांचे समभाग निफ्टी ५० मध्ये सर्वाधिक वधारले. निफ्टी ५० मध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, हिंडाल्को, टाटा स्टील, टीसीएस आणि एचसीएलचे शेअर्स सर्वाधिक घसरले.

टॅग्स :शेअर बाजार