बाजारात परकीय वित्तसंस्थांकडून मोठ्या प्रमाणात झालेल्या विक्रीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या निर्देशांकांनी वाढीव पातळीवर घेतलेली झेप हे गतसप्ताहाचे वैशिष्ट्य मानावे लागेल. आगामी सप्ताहात अनेक कंपन्यांचे तिमाही निकाल येणार आहेत. त्याचप्रमाणे औद्योगिक उत्पादन आणि चलनवाढीची आकडेवारी जाहीर होणार आहे. या सर्व बाबी बाजारावर परिणाम करणाऱ्या असून त्यांच्यामुळे आगामी सप्ताहात बाजार दोलायमान राहण्याची शक्यता दिसत आहे.
अमेरिकेत काय चाललेय?गतसप्ताहात अमेरिकेच्या औद्योगिक उत्पादनात घट झाल्याची आकडेवारी जाहीर झाली. त्याचप्रमाणे तेथील बेरोजगारीचे प्रमाणही वाढत असल्याचे दिसून आले. याचा परिणाम म्हणून अमेरिकेतील बाजार कोसळला. तसेच भारतातही काही दिवस बाजार घसरला. मात्र देशांतर्गत वित्तीय संस्थांनी सकारात्मक भूमिका घेत खरेदी केल्याने निर्देशांकांमध्ये सप्ताहाच्या अखेरीस वाढ झालेली दिसून आली.
कोट्यवधी रुपये बाजारातून काढले अमेरिकेतील वाढलेले व्याजदर हे परकीय वित्तसंस्थांना आकर्षित करीत आहेत. गतसप्ताहाच्या प्रारंभी भारतीय बाजारात परकीय वित्तसंस्थांनी खरेदी केली, मात्र त्यानंतर त्यांनी मोठी विक्री करून पैसा काढून घेतल्याचे दिसून आले. सप्ताहात परकीय वित्तसंस्थांनी भारतीय बाजारातून ३६.५५ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. त्याचवेळी वाढलेल्या जीएसटी संकलनापासून सकारात्मक दृष्टी ठेवून देशांतर्गत वित्तसंस्था बाजारात खरेदी करीत असल्याचे दिसून आले या संस्थांनी १०२४.०९ कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली.
गुंतवणूकदार श्रीमंत भारतीय शेअर बाजारामध्ये निर्देशांकांनी वाढ दर्शविल्यामुळे गतसप्ताह चांगला राहिला.या सप्ताहात बाजाराचे भांडवल मूल्य ३ लाख ७६ हजार ९४४.९४ कोटी रुपयांनी वाढले. वेगळ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास गुंतवणूकदार तीन लाख कोटींहून अधिक रकमेने श्रीमंत झाले आहेत.